Dehuroad crime News: देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार

एमपीसी न्यूज – देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. एका गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तर एकाला सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

रोहित उत्तम अलकोंडे (वय 29, रा. गांधीनगर देहूरोड), जाफर मेहबुब शेख (वय 28, रा. जामा मस्जिद चाळ, आंबेडकरनगर, देहूरोड) अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत.

रोहित अलकोंडे हा देहूरोड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर दुखापत पोहचवणे, दंगल करुन वाहनांची तोडफोड करणे, सरकारी नोकराला इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे अशा प्रकारचे तीन गुन्हे दाखल आहेत.

या गुंडाची गुन्हेगारी फोफावल्याने लोकांमध्ये त्याची दहशत निर्माण होवू लागली होती.

त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) प्रमाणे तडीपार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

जाफर शेख हा देखील देहूरोड पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुन व खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

त्याला खुनाच्या गुन्ह्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाने 12 ऑक्टोबर 2017 रोजी जन्मठेपेची शिक्षा आणि 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे. परंतु, उच्च न्यायालयाने त्याला जामीनावर सोडले आहे.

जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा करुन दहशत निर्माण केली. त्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 57(1)(अ) प्रमाणे तडीपार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. त्याला सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार, पोलीस उप निरीक्षक अशोक कोकाटे, पोलीस नाईक अनिल जगताप, पोलीस शिपाई सुनिल यादव यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.