Dehuroad Crime News : जिन्याच्या डक्टमध्ये पडून कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम साईटवर जिन्याच्या डक्टमध्ये पडून गंभीर जखमी होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना आदर्शनगर, किवळे येथे के व्हिला लेबर कॅम्प येथे बुधवारी (दि. 10) सायंकाळी घडली.

तपास रायपदा मंडल (वय 31, रा. के व्हिला लेबर कॅम्प, आदर्शनगर, किवळे) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी कार्तिक शिकारे, गणेश होनमाने (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश कांबळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदर्शनगर किवळे येथे के व्हिला नावाची बांधकाम साईट सुरु आहे. त्यावर मयत मंडल हे काम करत होते. आरोपींनी बांधकाम साईटवर सुरक्षेसाठी लोखंडी जाळी, बॅरिकेटिंगची व्यवस्था केली नाही. तसेच जिन्याचा डक्ट उघडा ठेवला.

बुधवारी सायंकाळी काम करत असताना कामगार मंडल त्या उघड्या डक्टमध्ये पडले. दुस-या मजल्यावरून पडल्याने मंडल गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.