Dehuroad crime : …. म्हणून केला तिने पतीचा खून

आरोपी रितू हिला तिचा पती मयत मयूर याच्याकडून लैंगिक छळ होत होता. याबाबत तिने तिच्या सासरच्या लोकांना सांगितले होते. मात्र तिची त्या त्रासातून सुटका होत नसल्याने तिने मयूरला संपवण्याचा कट केला.

एमपीसी न्यूज – पतीकडून होत असलेल्या लैंगिक छळाला कंटाळून पत्नीने पतीचा फावड्याने मारून खून केला. पती झोपेत असतानाच पत्नीने त्याचा खून केला आणि शेजारच्या लहान मुलांसोबत सायकलिंगसाठी निघून गेली. सायकलिंग करून आल्यानंतर ‘अज्ञातांनी तिच्या पतीचा खून केल्या’चा बनाव केला. मात्र पोलीस तपासात सर्व सत्य बाहेर आले. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट पाचने याबाबत अधिक तपास केला आहे.

रितू मयूर गायकवाड (वय 20, रा. भैरोबामंदिराच्या मागे, मामुर्डी, देहूरोड) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. मयूर गोविंद गायकवाड (वय 28) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. ओमकार गोविंद गायकवाड (वय 25) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद फिली आहे.

आरोपी रितू हिला तिचा पती मयत मयूर याच्याकडून लैंगिक छळ होत होता. याबाबत तिने तिच्या सासरच्या लोकांना सांगितले होते. मात्र तिची त्या त्रासातून सुटका होत नसल्याने तिने मयूरला संपवण्याचा कट केला. रितूने मागील चार दिवसांपासून शेजारी राहणारी एक महिला आणि लहान मुलांसोबत मॉर्निंगवॉकला जाणे सुरू केले.

ती नवरा घरात एकटा असल्याची वाट पाहत होती. सोमवारी (दि. 28) रात्री तिच्या सासूला रात्रपाळी होती. तिची सासू एका रुग्णालयात काम करते. दिर सोमवारी रात्री घरी येणार नव्हता. सोमवारी रात्री 11 वाजता पती मयूर दारू पिऊन घरी आला. जेवण करून पती झोपला. त्यानंतर आरोपी रितू रात्रभर मयूरला मारण्याचा विचार करत होती.

नेहमीप्रमाणे मंगळवारी पहाटे ती शेजारची महिला आणि लहान मुलांसोबत मॉर्निंगवॉकला गेली. तिकडून आल्यानंतर घरात मयूर झोपला होता. तिने मयूरच्या डोक्यात फावड्याने मारले. त्यानंतर गळ्यावर फावड्याच्या पुढच्या भागाने वार करून मयूरचा खून केला. खून करताना मयूरचे कपड्यांवर उडालेले रक्त तिने पाण्याने साफ केले आणि ती पुन्हा शेजारच्या लहान मुलांसोबत सायकलिंगला गेली.

सायकलिंग करून सकाळी सव्वासात वाजता घरी आल्यानंतर तिने बनाव केला की, ती घरी नसताना अज्ञातांनी मयूरचा खून केला.’ मोठमोठ्याने आरडाओरडा करून शेजा-यांना गोळा केले. शेजारी जमा झाल्यावर तिने चक्क बेशुद्ध पडल्याचे देखील नाटक केले. मात्र पोलिसांच्या तपासात ती गांगरून गेली आणि सर्व सत्य सांगितले. पोलिसांनी तिला अटक केली आहे.

दरम्यान, मयत मयूरचा भाऊ ओमकार याने दिलेल्या फिर्यादीत आरोपी रितू ही लग्नानंतर देखील गैरवर्तन करत होती. त्यातूनच तिने तिच्या अज्ञात साथीदारासोबत मिळून हा खून केल्याचे म्हटले आहे.

गुन्हे शाखा युनिट पाचचे वरिष्ठ निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, मयूर वाडकर, संदिप ठाकरे, धनराज किरनाळे, ज्ञानेश्वर गाडेकर, श्यामसुंदर गुट्टे, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, सावन राठोड, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, भरत माने, राजकुमार इघारे, गणेश मालुसरे व राजेंद्र कदम यांनी ही कारवाई केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.