Dehuroad Crime Update : देहूरोडमध्ये आणखी एक खुनाची घटना

Dehuroad Crime Update: Another murder in Dehuroad देहूरोड उड्डाणपुलावर सापडला होता संशयास्पद अवस्थेत मृतदेह

एमपीसी न्यूज – देहूरोडमध्ये खून करून मृतदेह पोत्यात बांधून इंद्रायणी नदीत टाकल्याची घटना मागील महिन्यात घडली होती. त्यानंतर आणखी एक खुनाची घटना उघडकीस आली आहे. खून करून मृतदेह पुणे-मुंबई महामार्गावर रेल्वे पुलावर टाकला होता. ही घटना सोमवारी (दि. 8) सकाळी उघडकीस आली. याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मंगळवारी (दि. 9) रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे मुंबई महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक संशयास्पद मृतदेह आढळून आला. हा प्रकार मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या काही नागरिकांनी पाहिला. नागरिकांनी याबाबत देहूरोड पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मृतदेह रक्ताने माखलेला होता. डोक्याजवळ एक मोठा दगड आढळून आल्याने पोलिसांना घातपाताचा संशय आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात पाठवून दिला.

शवविच्छेदन अहवालात खून झालेल्या व्यक्तीच्या डोक्यात मारून त्याचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे.

मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. खून झालेल्या व्यक्तीने गुलाबी शर्ट, गडद निळ्या रंगाची पॅन्ट, फिक्कट निळ्या रंगाची जॉनी गोल्ड कंपनीची अंडरवेअर असा पोशाख परिधान केलेला आहे.

वय अंदाजे 40 ते 45 वर्ष, वर्ण गव्हाळ, मजबूत बांधा, उंची अंदाजे साडेपाच फूट, गोल चेहरा, डोक्याचे केस काळे, दाढीचे केस काळे-पांढरे व थोडेसे वाढलेले. उजव्या हाताच्या पोटरीवर ओम नमःशिवाय, तसेच हाताच्या अंगठ्याजवळ इंग्रजीत आर असे गोंदलेले आहे.

यापूर्वी 18 मे रोजी इंद्रायणी नदीत एक मृतदेह सापडला होता. तो मृतदेह हातपाय बांधून पोत्यात बांधलेला होता. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवून तपास केला असता त्याच्या सहकारी मित्रांनीच खून केल्याचे उघडकीस आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.