Dehuroad : पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ राडा; एकावर खुनी हल्ला, सहा जणांना अटक

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ राडा झाला. यामध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करत खुनी हल्ला केला. याप्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वा अकराच्या सुमारास गांधी नगर रोड, देहूरोड येथे घडली.

निलेश दादू वाघमारे याने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, कोमल हिरेमठकर, जाफर शेख, फय्याज शेख, जुबेर शेख, आयज शेख, फारुख शेख (सर्व रा. देहूरोड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी जमाव जमवून हातात लोखंडी कोयता, बांबू, हॉकीस्टिक बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. तसेच निलेश याला लाकडी दांडक्याने मारहाण केली. निलेशचा मित्र करणकुमार सल्लामुत्तु याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये करणकुमार याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच आरोपींनी निलेश याच्या डोक्यात मारून खून करण्याचा प्रयत्न केला.

याच्या परस्पर विरोधात जाफर मेहबूब शेख (वय 29, रा. आंबेडकर नगर, देहूरोड) याने फिर्याद दिली. त्यानुसार, काशीनाथ बाळू पाटोळे (वय 39, रा. मामुर्डी), अजय कुमार पिल्ले (वय 23), सुनील शंकर शेट्टी (वय 23), आकाश उर्फ गोट्या अमरीश धोत्रे (वय 24), निलेश दादू वाघमारे (वय 23), रवी नाईक (सर्व रा. देहूरोड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. यांच्यासह अन्य सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी जमाव जमवून हातात लोखंडी कोयता, बांबू, हॉकीस्टिक बाळगून परिसरात दहशत निर्माण केली. फिर्यादी शेख, त्याची पत्नी व आई यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. शेख याला कोयत्याच्या उलट्या बाजूने मारून गंभीर जखमी केले. तसेच एमएच 14 / जेव्ही 7862 या दुचाकीची तोडफोड केली. आरोपींनी शेख याचा मित्र कोमल हिरेमठकर याच्या घराचीही तोडफोड करून नुकसान केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.