_MPC_DIR_MPU_III

Dehuroad : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर ‘कंटेनमेंट झोन’ घोषित

एमपीसी न्यूज – देहूरोड छावणी परिषदेचा (कॅन्टोन्मेंट बोर्ड) परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी (दि. 3) रात्री 12 पासून हा परिसर पोलिसांनी सील केला आहे. पुढील आदेशपर्यंत या परिसरातून कोणत्याही नागरिकाला बाहेर अथवा बाहेरील व्यक्तीला आत येता येणार नाही. अत्यावश्यक सेवा पुरविणा-या यंत्रणेला यातून वगळण्यात आले आहे.

देहूरोड परिसरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्याने खबरदारी म्हणून प्रशासनाकडून देहूरोड छावणी परिषदेच्या परिसराला प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) म्हणून घोषित केले आहे. याबाबत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील 21 भागांनाही कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.

कंटेनमेंट झोनमधून अत्यावश्यक सेवा पुरविणा-या कर्मचारी व वाहनांना वगळण्यात आले आहे. शासनाने परवानगी दिलेली क्लिनिक वगळता अन्य बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) आणि दवाखाने बंद राहतील. बँका, दूध, भाजीपाला, मटण, चिकन दुकाने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील. तर एटीएम सेंटर पूर्णवेळ सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहील.

सामाजिक हेतूने वृद्धाश्रम, निराधार, अपंग, ज्येष्ठ नागरिक, एकाकी व्यक्ती यांना संस्थांच्या माध्यमातून पुरविल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवा, भोजन, रुग्णांची काळजी घेणाऱ्या व्यक्ती यांना यातून सूट देण्यात आली आहे. परवानगी मिळालेल्या चारचाकी वाहनांमध्ये चालक आणि दोन प्रवासी यांना परवानगी आहे. देहूरोड परिसरातून बाहेर जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. प्रत्येक वाहन आणि व्यक्तीची कठोर तपासणी केली जात आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.