Dehuroad : फिरून मटका घेणा-या दोघांना गुन्हे शाखेकडून अटक

एमपीसी न्यूज – फिरून मटका घेणा-या दोघांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून मटका जुगाराचा 1 हजार 90 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

विकास शिवाजी लष्करे (वय 24) आणि आकाश शंकर लष्करे (वय 25, दोघे रा. राजनगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला, धनराज किरनाळे, मयूर वाडकर, ब्रम्हांदे देहूरोड परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, तळवडे-चिखली रोडला रेणुका हॉटेलच्या पुढे मोकळ्या जागेत दोन व्यक्ती फिरून मटका जुगार घेत आहेत. त्यानुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे, पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली. तसेच त्यांची झडती घेतली. दोघांकडे मटका जुगाराचे सुमारे 1 हजार 90 रुपये किमतीचे साहित्य आढळले. सर्व साहित्य जप्त करत दोघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.