Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने जीवनावश्यक साहित्य वाटपास प्रारंभ

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या वतीने कॅन्टोन्मेंट हद्दीतील गोरगरीब नागरिकांना जीवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आज ( मंगळवारी) वॉर्ड क्रमांक तीनमधील गांधीनगर येथे कॅन्टोमेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, स्थानिक नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू आणि देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या हस्ते नागरिकांना या किटचे वाटप करण्यात आले.

वॉर्ड क्रमांक तीनचा परिसर हा झोपडपट्टीबहुल असून, येथे गोरगरीब आणि हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या आधी आमदार सुनील शेळके यांच्यावतीने या भागात जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर आज देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डाच्या वतीने या वॉर्डांसाठी 82 किट देण्यात आले. त्यापैकी काही किटचे वाटप करण्यात आले.

यामध्ये स्थानिक नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनीही स्व:खर्चातून हातभार लावत अडीचशे ते तीनशे किट उपलब्ध केले आहेत.
राजकीय पक्ष किंवा विरोधक असा कोणताही भेदभाव न करता केवळ गरजूंना मदत झाली  पाहिजे, अशी आमची प्रामाणिक भावना आहे. या भावनेतूनच सर्व गरजुंना ही मदत पोहोच करणार आहे. साधारण चारशे गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्यक साहित्य पोहोच करणार असल्याचे नगरसेवक मारीमुत्तू यांनी सांगितले.

दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष  ब्रिगेडिअर संजय खन्ना यांच्या हस्ते सोमवारी पंडित जवाहरलाल नेहरू मंगल कार्यालयात या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. यासाठी बोर्डाने स्वतंत्र निधी उभारला आहे. यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी आपले एक महिन्याचे वेतन दिले आहे. या प्रसंगी कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सीईओ रामस्वरूप हरितवाल,सदस्या अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, ललित बालघरे, विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, गोपाळ तंतरपाळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.