Dehuroad : लिफ्टच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणा-या दोघांना अटक; एकजण फरार

एमपीसी न्यूज – लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवासी नागरिकांना लुटणाऱ्या दोघांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीतील चौथा आरोपी अद्याप फरार आहे. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

पवन प्रकाश कडाळे (वय 21, रा. म्हेत्रेवस्ती, चिखली. मूळ रा. लोणार, जि. बुलढाणा), संतोष अशोक इंगवले (रा. सरस्वती, ता. लोणार, जि. बुलढाणा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जबरी चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणे, जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांना तपासणे तसेच जबरी चोरी होणाऱ्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस गस्त वाढविणे अशा उपाययोजना पोलिसांकडून केल्या जात आहेत.

दरम्यान 12 नोव्हेंबर 2019 रोजी देहूरोड येथील सेंट्रल चौकातून बनावट नंबर प्लेट लावलेल्या इंडिका कारमधून आलेल्या चौघांनी एका इसमाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. कारमध्ये बसल्यानंतर इसमाच्या डोळ्यावर पट्टी बांधली. त्याला धमकी देऊन त्याच्याकडून क्रेडिट व डेबिट कार्ड घेतले. कार्डचे गोपनीय पिन क्रमांक घेऊन आरोपींनी त्याद्वारे सोने, कपडे, गॉगल्स अशी दोन लाख 12 हजार रुपयांची विविध ठिकाणी जाऊन खरेदी केली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस नाईक प्रमोद उगले यांना सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत असताना एका आरोपीची ओळख पटली. त्यानुसार अन्य आरोपींची माहिती काढण्यात आली. तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप यांना माहिती मिळाली की, या गुन्ह्यातील चारही आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे आहेत. त्यावरून देहूरोड पोलिसांचे एक पथक बुलढाणा जिल्ह्यात रवाना झाले. पोलिसांची कुणकुण लागताच अविनाश शिंदे हा आरोपी फरार झाला. त्यामुळे पोलिसांच्या हाती तीनजण लागले. त्यातील एकजण अल्पवयीन मुलगा आहे. एकाला ताब्यात घेत दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे दागिने, इंडिका कार, बनावट नंबर प्लेट असा एकूण तीन लाख 50 हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

फरार झालेल्या आरोपी अविनाश शिंदे याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याने पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत देखील काही गुन्हे केल्याचे निदर्शनास आले आहे. देहूरोड पोलिसांच्या या कारवाईमुळे देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन, शिरूर आणि शिक्रापूर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहपोलीस आयुक्‍त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी जी गज्जेवार, निरीक्षक अशोक जगताप, गणेश गायकवाड, पोलीस कर्मचारी सुभाष सावंत, प्रमोद उगले, मयूर जगदाळे, प्रशांत पवार, जगताप, संकेत घारे, सुमित मोरे, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, विकी खोमणे, गायकवाड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like