Dehuroad: शहरातील कोरोना परिस्थिती आणि विकासकामांचा आमदार शेळके यांनी घेतला आढावा

Dehuroad: MLA Shelke takes review of Corona situation and development works in Dehuroad

एमपीसी न्यूज  : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासह देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील नागरी सुविधांसाठी मावळचे आमदार सुनील  शेळके यांनी मंगळवार दिनांक 26 मे रोजी देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डात येऊन आढावा घेतला.

राज्य सरकारतर्फे देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डास विलगीकरण कक्ष, औषधे, साहित्य आदी सुविधा, क्वारंटाईन नागरिकांचे भोजन, बोर्डातर्फे अन्नधान्य किट यासाठी प्रथमतः 18 लाख रूपये आणि नुकताच 50 लाख रुपये असा एकूण 68 लाख रूपयांचा निधी देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डास प्राप्त झाला असून त्याचा खर्च कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य विभागासाठी मावळ तालुक्यास 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी अंदाजे 3 ते 4 लाख रूपयांचे वैद्यकीय साहित्य देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डास यापूर्वी दिले आहे.

यावेळी कॅन्टोमेन्ट बोर्डाचे कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरीतवाल तसेच नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू, गोपळराव तंतरपाळे, अ‍ॅड. अरुणाताई पिंजण, तसेच महाविकास आघाडीतील पक्षाचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, भरत नायडू, परशुराम दोडमणी व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रवीण झेंडे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्डास महाराष्ट्र सरकारकडून सिध्दीविनायक नगरी, दत्तनगर व परिसरातील पाणी योजनेसाठी पाच कोटी निधी यापूर्वी मंजूर झालेला होता, पंरतु आघाडी सरकारने मागील काळातील काही मंजूर निधींना स्थागिती दिली होती. मात्र या भागातील गरज लक्षात घेता तसेच पाण्याचा जिव्हाळ्याचा

प्रश्न असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी तसेच महाविकासआघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आमदार यांना विनंती करून विशेष बाब म्हणून सदरचा निधी पुन्हा आघाडी सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मंजूर करून घेतला असून तसे पत्रही कॅन्टोन्मेंट बोर्डाला प्राप्त झाले आहे. त्याबाबत आढावा आमदार शेळके यांनी घेतला व ठेकेदारास लगेच काम सुरू करण्यास सांगितले. तसेच सदर पाणी योजनेसाठी 5 कोटी निधीस आणखी वाढीव निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

देहूरोड डिफेन्स थिएटरपासून चिंचोली, झेंडेमळा, समर्थनगर, हगवणेमळा, काळोखेमळा, लक्ष्मीनगर भागाकडे जाणारी पाण्याची मुख्य पाईपलाईन
फार जुनी झाल्याने त्या भागतील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे सदरची नवीन पाईपलाईन टाकण्यात येणार असून त्यासाठी वाढीव निधी आमदार सुनील शेळके हे मंजूर करवून घेणार आहेत.

दत्तनगर परीसरातील ड्रेनेज लाईन तातडीने दुरूस्तीचे आदेश दिलेले असून त्वरित दुरुस्तीचे कामकाज सुरू होणार आहे. आमदार सुनील शेळके यांच्या मार्फत देहूरोड शहरात  48 हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. चिंचोली, किन्हई परिसरातही वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.