Dehuroad News : …अन्यथा रस्त्यात बेशरमचे झाड लावू, मनसेचा कॅन्टोन्मेंट प्रशासनाला इशार

एमपीसी न्यूज – देहूरोड शहरातील बहुतांश रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणं सुद्धा तुटली आहेत. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी; अन्यथा रस्त्यात बेशरमचे झाड लावण्याचा इशारा मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनी दिला आहे.

याच संदर्भात दास यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांना निवेदन दिले आहे. देहुरोड शहरातील व बाजारपेठांतील बहुतांश रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरील ड्रेनेजची झाकणं सुद्धा तुटली आहेत. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे अपघातही घडू लागले आहेत. अपघात रोखण्यासाठी या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी दास यांनी निवेदनात केली आहे.

दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी दास यांच्याकडून निवेदन स्वीकारले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.