Dehuroad crime News : देहूरोड परिसरातील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानीवर ‘एमपीडीए’ची कारवाई

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरातील कुप्रसिद्ध गुन्हेगार जोएल पलानी याच्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. 20) स्थानबद्ध करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

जोएल भास्कर पलानी (वय 21, रा. ब्रिंगल जीम समोर, साईनगर, मामुर्डी, देहुरोड) असे स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हेगारांच्या रेकॉर्डनुसार त्यांच्यावर पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यातच देहूरोड परिसरातील कुप्रसिद्ध गुन्हेगार पलानी याच्यावर पोलिसांनी स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.

पलानी याच्यावर लोखंडी रॉड, कोयता, गावठी पिस्तोल यासारखी जीवघेणी हत्यारांसह दरोडा घालणे, दंगा करून गंभीर दुखापत करणे, जाळपोळ तोडफोड करून मालमत्तेचे नुकसान करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे. गंभीर दुखापत करून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेचा भंग करणे व अवैधरित्या शस्त्र जवळ बाळगणे यांसारखे 9 गंभीर गुन्हे दाखल आहेत. पलानी याचे गुन्ह्यांचे हे रेकॉर्ड मागील तीन वर्षातील आहे.

त्याचा गुन्ह्यांचा चढता आलेख पाहून पोलिसांनी त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात रविवारी (दि. 20) स्थानबद्ध केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.