Dehuroad Murder Update: प्रेमसंबंधातून तरुणीचा खून; अपहरण करून तिचा गळा दाबला, दगडाने ठेचून खाणीत फेकला मृतदेह

देहूरोड खून प्रकरणातील अटक प्रमुख आरोपीने दिला पोलिसांना कबुलीजबाब

एमपीसी न्यूज – देहूरोड परिसरात एका तरुणीचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार रविवारी (दि. 27) सकाळी उघडकीस आला. यातील दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. अटक केलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले की, प्रथम तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर तिला आदर्शनगर येथील खाणीत नेऊन तिचा गळा दाबला व दगडाने ठेचून तिचा खून केला. नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह खाणीत फेकून दिला.

प्रिया शीलवंत चव्हाण (वय 20 वर्ष,रा आदर्शनगर, किवळे, देहूरोड) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रशांत गायकवाड (वय 35), विक्रम रोकडे (रा. राहटणी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा तिसरा साथीदार अभिजित दडे याचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रशांत आणि प्रिया यांचे मागील पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रशांत याचा विवाह झालेला आहे. त्याला दोन मुले आहेत. तरीही त्याने प्रियाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यातूनच त्यांना एक मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर प्रशांत याने प्रिया सोबत विवाह करण्यास तसेच मुलीच्या संगोपनाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. दरम्यान प्रिया तिच्या माहेरी आदर्शनगर येथे राहत होती. त्यावरून प्रिया आणि प्रशांत यांच्यात वारंवार भांडण होत होते.

शनिवारी (दि. 26) रात्री बारा वाजता प्रशांत हा प्रियाच्या माहेरी आला. त्याने पुन्हा प्रिया सोबत भांडण काढून रात्री दोन वाजताच्या सुमारास जबरदस्तीने तिला घरातून नेले.

प्रशांतने आदर्शनगर येथील खाणीजवळ नेऊन प्रियाचा गळा दाबला. त्यानंतर दगडाने ठेचून तिचा खून केला. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी प्रशांतने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून प्रियाचा मृतदेह खाणीत फेकून दिला.

प्रिया सोबत भांडण करून तिला घरातून नेल्यावर प्रियाची बहीण रेश्मा चव्हाण (वय 24) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्याच गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, आरोपी प्रशांत पळून जाण्याच्या तयारीत आहे. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थेरगाव येथील डांगे चौकातून ताब्यात घेतले.

त्याच्याकडे प्रियाबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून प्रियाचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रशांतचा साथीदार विक्रम यालाही ताब्यात घेतले.

आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

आरोपी प्रशांत याच्यावर सन 2016 मध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.