Dehuroad: लॉकडाऊनमध्ये मुंबईला पायी जाणाऱ्याचा खून, पैसे देण्यास नकार दिल्याने 3 अल्पवयीन मुलांनी केले कृत्य

Dehuroad: Murder of a Mumbai pedestrian in lockdown, 3 minors in custody मृत दत्तात्रय हे मूळचे सोलापूर येथील आहेत. ते सध्या भिवंडी येथे राहत होते. लॉकडाऊन जाहीर होण्या अगोदर ते आपल्या गावी नातेवाईकांकडे सोलापूर येथे गेले होते.

एमपीसी न्यूज- लॉकडाऊनच्या काळात प्रवासाची कुठलीही सोय नसल्याने तसेच पैसे नसल्याने सोलापूर येथून मुंबईला पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीचा देहूरोड येथे खून झाला. तीन अल्पवयीन टवाळखोर मुलांनी त्या पादचाऱ्याला निगडी येथे पैसे मागितले. पादचाऱ्याने पैसे देण्यास नकार दिला. यावरून त्या तीन मुलांनी देहूरोड येथे पादचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून निर्घृणपणे खून केला. ही घटना 8 जून रोजी घडली. यातील तिन्ही अल्पवयीन मुलांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

देहूरोड येथील रेल्वे उड्डाणपुलावर 8 जून रोजी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली आणि हा प्रकार पोलीस दप्तरी दाखल झाला.

याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला.

मृताच्या शर्टवरुन पटवली ओळख

कुठलाही पुरावा नाही, मृताची ओळख नाही. यामुळे या खुनाचा तपास लावणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. युनिट पाचचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे यांनी दोन दिवस मृताच्या अंगावरील कपड्यांवरून त्याची माहिती काढत होते.

दोन दिवसानंतर माहिती मिळाली की, मृत व्यक्तीच्या अंगावर असलेले कपडे भिवंडी येथील प्रिन्स टेलर, भिवंडी यांनी शिवलेले आहेत.

पोलिसांनी तात्काळ भिवंडीला धाव घेतली आणि टेलरच्या मदतीने मृताच्या नातेवाईकांचा शोध घेतला. त्यात मृताचे नाव दत्तात्रय कृष्णाजी माचर्ला (वय 41, रा. शांतीनगर सहयोग नगर, भिवंडी. मूळ रा. इंद्रा वसाहत, भवानी पेठ, घोंगडेवस्ती, सोलापूर) असे असल्याचे निष्पन्न झाले. ओळख पटल्यानंतर अर्धे काम झाल्याचा निश्वास पोलिसांनी सोडला.

मृत व्यक्ती सोलापुरचा

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत दत्तात्रय हे मूळचे सोलापूर येथील आहेत. ते सध्या भिवंडी येथे राहत होते. लॉकडाऊन जाहीर होण्याच्या अगोदर ते आपल्या गावी नातेवाईकांकडे सोलापूर येथे गेले होते.

त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाला आणि ते गावी अडकून पडले. त्यांचा परिवार भिवंडी येथे होता. परिवाराची काळजी आणि पैशांअभावी त्यांनी पायी चालत जाण्याचा मार्ग निवडला. ते सोलापूर येथून पायी चालत निघाले.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार आरोपींचे मुंबई येथील सायन परिसरात धागेदोरे असल्याचे समजले. खून करणाऱ्या आरोपींनी सायन येथील एका व्यक्तीशी संपर्क केल्याचे समोर आले.

कमलानगर झोपडपट्टी, वडाळा येथे आरोपींचा शोध घेत तीन आरोपी निष्पन्न झाले. मात्र, हे तिन्ही आरोपी अल्पवयीन असून ते तिथे नव्हते. दरम्यान चौकशीत एका आरोपी अल्पवयीन मुलाने त्याच्या वडिलांकडून 300 रुपये गुगल पे द्वारे घेतले होते.

कमलानगर झोपडपट्टीमध्ये सध्या कोरोनाचे अडीच हजार पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. अशा वातावरणात देखील पोलिसांनी शोध घेतला.

त्यानंतर एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना हैद्राबाद येथून फोन आल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तात्काळ हैद्राबादकडे धाव घेतली.

दरम्यान, एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या कार्यालयात आणले आणि अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांच्या फोनवर संपर्क करण्यास भाग पाडून त्यांची माहिती घेतली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी खामगाव, यवत येथून तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेली अल्पवयीन मुले तेलंगणा राज्यातील विजयवाडा, हैदराबाद आणि रंगारेड्डी अशा वेगवेगळया भागातील आहेत. ही मुले यापूर्वी चाइल्ड होम, हैद्राबाद आणि मुंबई येथे राहण्यास होती. चाइल्ड होममध्ये असताना तिघांची ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत झाले होते.

मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, ते तिघे भक्ती-शक्ती चौक येथून एकमेकांशी बोलत पायी चालत मुंबई येथे जात होते. त्यावेळी दत्तात्रय देखील तिथून पायी चालत जात होते.

झोपल्यानंतर डोक्यात दगड घातला

एका मुलाने मयत दत्तात्रय यांच्याकडे पैसे मागितले. परंतु दत्तात्रय यांनी पैसे दिले नाहीत. त्याचा राग मनात धरुन मुलांनी दत्तात्रय रस्त्यात झोपल्यानंतर त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून मारण्याचा आणि त्यांच्याकडील पैसे लुटण्याचा डाव आखला.

त्याप्रमाणे देहूरोड येथे रेल्वे पुलाजवळ आल्यानंतर रात्र झाल्याने दत्तात्रय रेल्वे पुलाच्या बाजूला फुटपाथवर झोपले. त्यावेळी मुलांनी दत्तात्रय यांच्या डोक्यात दगड घालून ठार मारले.

मुलांनी दत्तात्रय यांच्याकडील पैसे व मोबाईल काढून घेऊन तिथून पळ काढला. तिन्ही मुलांना पुढील तपासासाठी देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

कोणताही पुरावा नसताना केवळ टेलरच्या टॅगवरून हा तपास लागला आहे. यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी शोध मोहीम राबवली आहे.

सुतावरून स्वर्ग गाठता आल्याने पोलीस आयुक्तांकडून युनिट पाचच्या तपास पथकाचे कौतुक करण्यात आले.

ही कामगिरी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी फारुक मुल्ला, भरत माने, मयुर वाडकर, नागेश माळी, नितीन बहिरट, ज्ञानेश्वर गाडेकर, दयानंद खेडकर, धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, संदिप ठाकरे, स्वामीनाथ जाधव, धनंजय भोसले, राजकुमार इघारे, श्यामसुदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे, सावन राठोड, गणेश मालुसरे, राजेंद्र शेटे, राजेंद्र कदम यांच्या पथकाने केली.

तसेच तपासकामात टी.टी. मार्ग पोलीस स्टेशन, वडाळा मुंबई येथील गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित बिराजदार, पोलीस कर्मचारी राजकिरण बिलासकर, भूषण भोसले व सागर पाटोळे यांनी मदत केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.