Dehuroad : सरपण विकण्याच्या वादातून एकाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – सरपण विकण्याच्या वादातून दोघांनी मिळून एकाचा खून केला. दोन्ही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 20) देहूगावमधील झेंडेमळा येथे घडली.

रामदास मेंगळे (रा. झेंडेमळा, देहूगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शाम मेंगळे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बबन मेंगळे आणि गणपत मेंगळे यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाम मेंगळे त्यांच्या कुटुंबासह झेंडेमळा येथे शेतात राहतात. मंगळवारी दुपारी त्यांची पत्नी जिजा आणि भाऊ रामदास यांच्यामध्ये सरपण विकण्यावरून वाद झाला. या वादातून जिजा हिने भाऊ बबन मेंगळे याला फोन करून हा प्रकार सांगितला. रात्री साडेसातच्या सुमारास बबन मेंगळे हा त्याचा चुलत भाऊ गणपत याला घेऊन आला. दोघांनी रामदास यांना लाकडी दांडक्याने आणि लोखंडी पाईपमारहाण केली.

घटनेनंतर रामदास निपचित पडले. रामदास झोपी गेल्याचे समजून काही वेळ शाम यांनी त्यांना उठवले नाही. रात्री दहाच्या सुमारास त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला असता ते उठले नाहीत. शाम यांनी शेजा-यांच्या मदतीने रामदास यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच रामदास यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.