Dehuroad : दुकान फोडून मोबाईल चोरणाऱ्या एका नेपाळी चोराला अटक ; गुन्हे शाखा युनिट पाचची कारवाई

एमपीसी न्यूज – मोबाईलचे दुकान फोडून दुकानातून लॅपटॉप, मोबाईल चोरून नेल्या प्रकरणी एका नेपाळी चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून चोरीचा ऐवज आणि चोरी करताना वापरलेली दुचाकी असा 2 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अन्य एका कारवाईमध्ये पोलिसांनी एका चोरट्याला अटक करत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

जनककुमार विक्रम साही (वय 38, रा. चिखली. मूळ रा. ओमकाना, जि. दैलीक, नेपाळ) असे मोबाईल दुकान फोडल्याप्रकरणी अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर अब्दुल शब्बीर अब्दुल कादर शेख (वय 20, रा. भारतनगर, बांद्रा ईस्ट, मुंबई. मूळ रा. विकासनगर, देहुरोड) याला जबरी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे आणि दत्तात्रय बनसुडे यांना बुधवारी (दि. 5) गस्तीवर असताना माहिती मिळाली की, एक व्यक्ती देहूरोड येथील सेंट्रल चौकात चोरीचे मोबाईल फोन विक्रीसाठी दुचाकीवरून येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सेंट्रल चौक परिसरात सापळा लावून जनककुमार याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या एका साथीदारासह मिळून जानेवारी महिन्यात सोमाटणे फाटा येथे एक मोबाईल दुकान फोडून चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी नेपाळी चोरट्याकडून एक लॅपटॉप, 10 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा 2 लाख 58 हजार रुपयांचा ऐवज जप्त करून अटक केली. पुढील कारवाईसाठी चोरट्याला तळेगाव दाभाडे पोलिसांकडे देण्यात आले आहे.

दुस-या एका कारवाईमध्ये पोलीस कर्मचारी फारूक मुल्ला आणि संदीप ठाकरे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत चोरीचे मोबाईल फोन विक्रीसाठी आला आहे. त्यानुसार देहूरोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी लेखा फार्म येथे एका व्यक्तीला अडवून मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला होता. दोघांकडून 20 हजार रुपयांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. पुढील कारवाईसाठी चोरट्याला देहूरोड पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव, गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे, धनराज किरनाळे, मयूर वाडकर, फारुक मुल्ला, संदीप ठाकरे, गणेश मालुसरे, दयानंद खेडकर, राजकुमार इघारे, ज्ञानेश्वर गाडेकर, धनंजय भोसले, स्वामीनाथ जाधव, भरत माने, श्यामसुंदर गुट्टे, गोपाळ ब्रम्हांदे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.