Dehuroad News: ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा डोंगरा माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द

मंदिर समितीचा निर्णय

एमपीसी न्यूज – संत तुकाराम महाराज यांचे चिंतनस्थळ असणा-या श्री श्रेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षी होणारा माघ शुद्ध दशमी सोहळा ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. 5 ते 13 फेब्रुवारी दरम्यान सोहळा साधेपणाने साजरा होणार आहे. दशमीला होणारा महाप्रसाद आणि जाहीर कार्यक्रम यंदा होणार नसल्याचे मंदिर देवस्थानने कळविले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध सण आणि धार्मिक उत्सव साधेपणाने साजरे केले जात आहेत. मावळ तालुक्यातील श्री श्रेत्र भंडारा डोंगर येथे दरवर्षी संत तुकाराम महाराज यांची जयंती अर्थात वसंत पंचमी ते माघ शुद्ध त्रयोदशीपर्यंत दशमी सोहळयाचे आयोजन केले जाते. तसेच माघ शुद्ध दशमीला दोन ते तीन लाख वारकरी दर्शनासाठी येत असतात.

भंडारा डोंगर ट्रस्ट माघ शुद्ध दशमी समितीच्या वतीने अखंड हरीनाम सप्ताह, प्रवचन, कीर्तन, गाथा पारायण सोहळा, माघ शुद्ध दशमीला भारूड, प्रवचनांचे आयोजन केले जाते. गाथा मिरवणूक काढण्यात येते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे दक्षता म्हणून यावर्षी माघ शुद्ध दशमी सोहळा रद्द केला आहे. सोहळ्याच्या निमित्ताने होणा-या धार्मिक विधीवत पूजा आदी कार्यक्रम हे कोरोना नियमांचे पालन करून करण्यात येणार आहेत.

वारक-यांनी भंडारा डोंगरावर गर्दी करू नये
यासंदर्भात भंडारा डोंगर दशमी समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा प्रशासनाने कोरोना संदर्भात केलेल्या सूचनांसदर्भात माहिती देण्यात आली. तसेच कोरोना नियमांचे पालन करून उत्सव हा साधेपणाने साजरा करण्यावर एकमत झाले. तसेच वारक-यांनी भंडारा डोंगरावर गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहेत.

याबाबत दशमी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब काशिद म्हणाले, ”गेली दोन वर्षे कोरोना महामारीचे संकट आपल्यावर आहे. त्यामुळे भंडारा डोंगरावरील दशमी सोहळा यंदा होणार नाही. नियमांचे पालन करून नैमित्तीक पूजा, विधी करण्यात येणार आहेत. डोंगरावर होणारा महाप्रसाद वाटप कार्यक्रम यंदा होणार नाही. कोरोनाचे संकट दूर व्हावे, ही तुकोबारायांचरणी प्रार्थना. वारक-यांनी या कालखंडात स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी.’’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.