Dehuroad News : भाजपने शब्द देऊन ऐनवेळी विश्वासघात केला- हाजीमलंग मारीमुत्तू

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी डावलण्यात आलेल्या काँग्रेसचे नगरसेवक हाजीमलंग मारीमुत्तू यांनी भाजपच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. भाजपने शब्द देऊन ऐनवेळी माझा विश्वासघात केला. विरोधी पक्षाकडून विकासकामांबाबत सहकार्याची अपेक्षा ठेवणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या निमित्ताने समोर आला, अशा शब्दांत मारीमुत्तू यांनी आपली नाराजी व्यक्त केली.  दरम्यान, सर्वसामान्य आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर यापुढेही सत्ताधाऱ्यांना सहकार्य केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

शुक्रवारी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सारिका नाईकनवरे यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी दिली. त्यामुळे काँग्रेसच्या हाजीमलंग मारीमुत्तू यांना ऐनवेळी डावलण्यात आले. भाजपच्या या डावपेचांनी मारीमुत्तू यांचा प्रचंड भ्रमनिरास झाला. याबाबत त्यांनी भाजप विषयी आपली नाराजी व्यक्त केली.

मारीमुत्तू म्हणाले, मावळचे राजकारण भलेही वेगळे असो. मात्र, देहूरोडच्या राजकारणात सर्व राजकीय पक्ष विकासकामांमध्ये एकत्र येत आले आहेत. जनतेशी निगडित प्रश्नांवर आम्ही कायम सहकार्याची भूमिका घेत आलो. नागरिकांचे प्रश्न, समस्या सुटाव्यात हा यामागे उद्देश होता.

याआधी वॉर्ड क्रमांक एकचे नगरसेवक रघुवीर शेलार यांना उपाध्यक्षपदाची संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला होता. त्यावेळी काँग्रेसच्यावतीने मी ही त्यांच्याविरोधात उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविणार होते. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मला पुढच्यावेळी संधी देण्याचा शब्द दिला होता.

आता शब्द पाळण्याची वेळ आली होती. मात्र, तो पाळला गेला नाही. माझा विश्वासघात करण्यात आला. शब्द पाळता येत नसेल तो द्यायचाच कशाला?, असा सवालही मारीमुत्तू भाजपच्या नेत्यांना विचारला आहे.

उपाध्यक्षपदाऐवजी मला गाजर देण्यात आले. भाजपकडून झालेली फसवणूक जिव्हारी लागली आहे. त्यामुळे आता आम्हालाही आमचा मार्ग मोकळा झाला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांच्याकडून अशा प्रकारे राजकारण केले जाऊ शकते हे स्वप्नातही कधी पहिले नाही. भाजपने देहूरोडच्या एकजुटीच्या प्रथेला हरताळ फासला असल्याची टीका मारीमुतू यांनी केली आहे.

दरम्यान, याबाबत बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले, कॅंटोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष म्हणून सर्वाधिक १५ महिने काम करण्याची संधी मला पक्षाने दिले. पक्षाने राजीनामा देण्याचा आदेश दिला. यानुसार मी राजीनामा दिला.

सध्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डात भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे भाजपच्याच सदस्याला उपाध्यक्षपदी संधी देण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला. आमचे स्पष्ट बहुमत असताना काँग्रेसच्या सदस्याला संधी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी कॅंटोन्मेंट बोर्डात कोणत्याही एका पक्षाचे बहुमत नसल्याने त्या त्या वेळच्या सदस्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या. त्यामुळे प्रत्येक सदस्याला उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती. मात्र, याआधी कॅंटोन्मेंट बोर्डात काँग्रेसची सत्ता असताना भाजपच्या सदस्यांना उपाध्यक्ष पद मिळून दिलेले नव्हते, अशी आठवण शेलार यांनी करून दिली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.