Dehuroad News : कॅंटोन्मेंट बोर्डातील सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष – आमदार सुनील शेळके

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने जनतेच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये बोर्डातील सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा घणाघाती आरोपी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला. निवडणूक आल्या की नारळ फोडायचे आणि नंतर दुर्लक्ष करीत शहरातील नागरिकांची केवळ दिशाभूल करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात असल्याची टिकाही त्यांनी केली.

देहूरोड शहरातील विविध मागण्यांकडे कॅंटोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने शुक्रवारी सकाळी ११ वाजता देहूरोड येथील सवाना चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. कॅंटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे -मुंबई महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वाराजवळ झालेल्या सभेत आमदार शेळके यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विठ्ठल शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, युवा सेना तालुका अधिकारी अनिकेत घुले काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू , राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष ॲड. कृष्णा दाभोळे, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, यांच्यासह राणी पंडियान, ज्योती वैरागर, व्यंकटेश कोळी, गफूर शेख, संगीता वर्धा, कांचन साळुंके, गीता राजलींगम, शीतल हगवणे , बाळासाहेब जाधव, ॲड. प्रवीण झेंडे, धनंजय मोरे, तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अमीन शेख, परशुराम दोडमणी, देवराज स्वामी, कयूम शेख , मनोज मिशप, विशाल दांगट,  देवा कांबळे, शशी सप्पागुरु, संदीप बालघरे, संदीप गोंटे, विजय थोरी, रामदास अलगिरे आदी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.

आमदार शेळके म्हणाले, शहरातील जनतेच्याविविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बोर्ड प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सिद्धिविनायकनगरीचा पाणीप्रश्न  15 वर्षांपासून प्रलंबित आहे. तो कायमस्वरूप सोडवावा. बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गोरगरिबांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळल्या पाहिजेत, रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले पाहिजे, अशा अनेक मागण्या आमदार शेळके यांनी यावेळी केल्या.

देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डात भाजपाची सत्ता आहे. गेल्या सहा वर्षात त्यांनी कोणत्याही नागरी सुविधा दिलेल्या नाहीत. देहूरोडमधील सर्व रस्ते खराब झाले आहेत. गटारांची दुरवस्था झाली आहे. झेंडे मळा ते काळोखे मळा या भागातल्या रस्त्याचे काम झाले नाही. बाजारात वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे .सिद्धिविनायक नगरीतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. बाजारपेठेसह अन्य ठिकाणच्या स्वछतागृहांची खूप वाईट अवस्था झाली आहे. कॅन्टोमेंट बोर्डावर भाजपची सत्ता असून देखील कोणताही फंड या नगरसेवकांनी केंद्राकडून आणलेला नाही. त्यांनी फक्त टक्केवारी खाऊन नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आमदार शेळके यांनी केला.

दरम्यान,  सीईओ रामस्वरूप हरितवाल यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा केली.  महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरूप हरिलाल यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली तसेच मागण्यांचे निवेदन दिले. महाविकास आघाडीने केल्या मागण्यांची पूर्तता करण्यात येईल तसेच सिद्धिविनायकनगरी पाणी प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत सोडविण्याचे आश्वासन सीईओ हरितवाल यांनी आंदोलकांना दिले.

 माझ्या पातळीवर जेवढ्या समस्या सोडविता येतील तेवढ्या मी सोडवितो. बाकी ज्या कामासाठी संरक्षण विभागाची परवानगी लागते. ती मिळविण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडूनही लवकरच परवानगी मिळणारे आहे. ती मिळाल्यास लगेच कामे करण्यास सुरुवास सुरुवात केली जाईल. रामस्वरूप हरितवाल – मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.