Dehuroad News : देहूरोडची ख्रिश्चन दफनभूमी अंधारात ; थकबाकीमुळे महावितरणकडून वीज जोड कापला

एमपीसीन्यूज : थकबाकीमुळे महावितरणकडून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शितळानगर येथील ख्रिश्चन दफनभूमीची वीज जोडणी तोडण्यात आल्याने या दफनभूमीत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दरम्यान, अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी कॅंटोन्मेंट प्रशासनाने तातडीने उपाययोजना करुन दफनभूमीतील वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

या संदर्भात रमेशन यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे तक्रार केली आहे.

वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून शितळानगर येथील ख्रिश्चन दफनभूमीची वीज जोडणी तोडण्यात आल्याने या दफनभूमीत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करून खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी रामेशन यांनी केली आहे.

ख्रिश्चन दफनभूमीची वीज जोडणी तोडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हा प्रकार निषेधार्ह आहे. सायंकाळी एखादा अंत्यविधीचा कार्यक्रम असल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. अंधारात अंत्यविधी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॅनियल चक्रनारायण यांनी केली आहे.

दरम्यान, महावितरणकडून झालेलया कारवाईचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनी निषेध केला आहे. थकबाकीमुळे किमान दफनभूमी किंवा स्मशानभूमीचा वीजपुरवठा खंडित करु नये, अशी मागणी ही दास यांनी केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिल्याची माहिती विधिमंडळ सभागृहात दिली होती. त्यानंतरही महावितरणाकडून कारवाई सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महावितरणकडून चार वर्षांचे दहा लाख रुपयांचे चुकीचे वीज बिल पाठविण्यात आले होते.  हे बिल दुरुस्त करून देण्याची मागणी महावितरणकडे करण्यात आली होती. त्यानुसार आज दुरुस्त केलेले वीज बिल कॅंटोन्मेंट बोर्डाला प्राप्त झाले आहे. या बिलाचा उद्या भरणा केला जाईल. तसेच एक, दोन दिवसात ख्रिश्चन दफनभूमीचा वीजपुरवठा पूर्ववत होईल.

रामस्वरूप हरितवाल- मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास ती या बातमीत समाविष्ट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.