Dehuroad News : देहूरोड येथील उड्डाणपुलाची अर्धवट कामे पूर्ण करा : भाजपची मागणी

एमपीसीन्यूज : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाची अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत; अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देहूरोड शहर भाजपच्या वतीने रस्ते विकास महामंडळाला देण्यात आला आहे.

या संदर्भात देहूरोड शहर भाजपच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील उड्डाणपुलाच्या अनेक अर्धवट कामांकडे शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधले.

यावेळी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, नगरसेवक विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, माजी शहराध्यक्ष ॲड. कैलास पानसरे, शहर सरचिटणीस तुकाराम जाधव, अंजली बत्तल, उमाशंकर सिंह  आदी उपस्थित होते.

उड्डाणपुलावर पाण्याच्या निचरा होत नाही. पावसाळ्यात पुलावर खुप पाणी साचते. भरधाव वाहनांमुळे हे साचलेले पाणी पुलाखालून ये- जा करणाऱ्या नागरिकांवर धबधब्या सारखे पडते. त्यामुळे पुलावर साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

सर्व्हिस रस्त्यावर जागो जागी खड्डे पडले आहेत. तसेच हा रस्ताही अरूंद आहे. त्याची अद्यापही दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे या सर्व्हिस रस्त्यावर बरेच अपघात झालेले आहेत. सर्व्हिस रस्त्याचे कामही काम तातडीने पूर्ण करून घ्यावे. सर्व्हिस रस्त्याला साईड पट्टा मारावा.

रेल्वे उड्डाणपुलाचे काम दिलेल्या आश्वासनानुसार अजुनही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुलावर रोज वाहतूक कोंडी व अपघात होतात. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ खर्ची पडतो. तसेच वादावादीचे प्रकारही घडत आहेत.

तसेच उड्डाण पुलाचे उद्घाटन होऊन 18 महिने होऊन गेले तरी रंगरंगोटी व सुशोभिकरण व अर्धवट असलेली किरकोळ कामे पूर्ण झालेली नाहीत.ही

सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा 15 जानेवारीनंतर भारतीय जनता पार्टीच्या वतिने माजी राज्य मंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.