Dehuroad News : शैक्षणिक शुल्क वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावू नका : युवा सेनेची मागणी

एमपीसीन्यूज : देहूरोड परिसरातील काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी फी आकारणी करीत आहेत. थकीत फी असलेल्या विद्यार्थ्यांना व्हाट्सअप ग्रुपमधून काढून टाकले जात आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावला जात आहे. त्यामुळे अनेक पालक हवालदिल झाले असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मावळ आणि देहूरोड युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी देहूरोड शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांना निवेदन देत विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत देण्यासह शुल्क वसुलीसाठी तगादा न लावण्याची मागणी केली.

युवा सेना जिल्हा समन्वयक अनिकेत घुले यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेचे मावळ उपतालुका अधिकारी विशाल दांगट, देहूरोड शहर युवा अधिकारी संदीप भुम्बक, शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख भारत ठाकूर, तालुका समन्वयक रमेश जाधव, शहर सल्लागार देवा कांबळे आदींच्या शिष्टमंडळाने देहूरोड येथील सेंट ज्यूड आणि रिपब्लिक स्कुलच्या व्यवस्थापनाची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

शासनाच्या आदेशानुसार ट्यूशन फी व्यतिरिक्त अवांतर कोणतेही शुल्क शाळांना आकारता येणार नाही तसेच नवीन फी वाढ करता येणार नाही. तरीही काही संस्था मनमानी करीत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी फी आकारणी करीत आहेत. थकीत फी असलेल्या विद्यार्थ्यांना व्हाटसअप गृपमधून काढून टाकले जात आहे. काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना फी भरण्याचा तगादा लावला जात असल्याच्या तक्रारी पालक वर्गाकडून करण्यात येत आहेत.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे पालकांनाही परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी फी सवलतीसह फीचे समान हप्ते करून द्यावेत. कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झालेले आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.