Dehuroad News : कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या श्रीजीत रमेशन यांचा ‘भाजयुमो’कडून गौरव

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीच्या काळात देहूरोड शहरातील सर्वधर्मीय कोरोना मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे मानवतावादी कार्य करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशनसह त्यांच्या सहकाऱ्यांचा पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने गौरव करण्यात आला.

भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस तेजस्विनी कदम यांच्या हस्ते रमेशन आणि के. पी. अ‍ॅडम, मंगेश कुमार पोडाळा तसेच मुथू केपीडीएम यांचा चांदीची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील सत्तेला सात वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तेजस्विनी कदम यांनी या कोरोना योद्ध्यांचा यथोचित गौरव केला. यावेळी  पिंपरी चिंचवड युवती प्रमुख शुभांगी कसबे, आकुर्डी युवती प्रमुख आरती बंबे,  संयोजिका सारिका माळी, कार्यकारणी सदस्य स्मिता रासकर आदी उपस्थित होत्या.

देहूरोडमधील कोविड मृतदेहांवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी आणि इतर स्मशानभूमींवर अवलंबून रहावे लागत होते. कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी काही मृत व्यक्तींचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी तसेच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी  घाबरत होते.

या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन आणि के. पी. अ‍ॅडम तसेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी यांनी पुण्यातील ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टसोबत संपर्क साधून यशस्वी पाठपुरावा केला.

त्यानंतर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी   ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टला देहूरोड शहरातील सर्वधर्मीय कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 18 मेला परवानगी दिली. त्यानुसार ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टने देहूरोड कोविड समर्पित पथकाची स्थापना केली.

या पथकातील प्रमुख माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांच्या नेतृत्वाखालील पथकाने 19 मेपासून 29 मे  या कालावधीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य धर्मियांच्या एकूण सात  कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार  केले.

या टीममध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन, के. पी. अ‍ॅडम, मंगेश कुमार पोडाळा, सायमन शट्टी, सुनील सांगली, चंद्रशेखर रजोली, राजेश सपारे, अमोल असंगीकर, आनंदराज पोल्या, जॉनसन रॉबर्ट आदींचा समावेश आहे.

या कार्याची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस तेजस्विनी कदम यांच्या हस्ते रमेशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गौरव केला.

पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चा युवती सेलने माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचा केलेला सत्कार सामाजिक कार्यासाठी बळ देणारा आहे. आमचे सेवाभावी कार्य आम्ही या पुढेही कोणतीही अपेक्षा न ठवता सुरु ठेवणार असल्याची भावना माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रामेशन यांनी व्यक्त केली.

संकटात मदतीला धावून येणारी उदाहरणे दुर्मिळ आहेत. पण, कोरोनासारख्या महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपत 7 कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे कार्य महान आहे. हे कार्य ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टचे स्वयंसेवक या पुढेही करतील यात शंका नाही.  त्यामुळे अशा रिअल कोरोना योद्ध्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांचा सन्मान केला.

तेजस्विनी कदम : भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.