Dehuroad News : कोरोना मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्धयांचा गौरव

देहूरोड शहर महाविकास आघाडीकडून कृतज्ञता व्यक्त

एमपीसीन्यूज  :  कोरोना महामारीच्या काळात देहूरोड शहरातील सर्व धर्मीय कोरोना मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार करण्याचे मानवतावादी कार्य करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रामेशनसह अन्य  कोरोना योद्धयांना  महाविकास आघाडीच्या वतीने पीपीई किट आणि हातमोजे देऊन  कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तसेच या कार्यासाठी आवश्यक ती मदत मिळवून देण्याचे आश्वासनही दिले. 

या पूर्वी देहूरोडमधील कोविड मृतदेहांवर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील निगडी आणि इतर स्मशानभूमींवर अवलंबून रहावे लागत होते. कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत होती. तर कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी काही मृत व्यक्तींचे नातेवाईक अंत्यसंस्कार करण्यासाठी तसेच मृतदेह ताब्यात घेण्यासाठी  घाबरत होते.

या पार्श्वभूमीवर  महाविकास आघाडीचे देहूरोडमधील पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि  माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी पुण्यातील ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टसोबत संपर्क साधून यशस्वी पाठपुरावा केला.

अखेर देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी   ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टला  देहूरोड शहरातील सर्व धर्मीय कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी 18 मेला   परवानगी दिली.  त्यासाठी कोविड समर्पित टीमची स्थापना करण्यात आली. या टीममध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन, के. पी. अ‍ॅडम, मंगेश कुमार पोडाळा, सायमन शट्टी, सुनील सांगली, चंद्रशेखर रजोली, राजेश सपारे, अमोल असंगीकर, आनंदराज पोल्या, जॉनसन रॉबर्ट आदींचा समावेश आहे.

या टीमने  19 मेपासून 29 मे  या कालावधीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन व अन्य धर्मियांच्या एकूण सात  कोविड मृतदेहांवर अंत्यसंस्कार  केले. या टीमने केलेल्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, शिवसेनेचे शहरप्रमुख भरत नायडू, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश  जाधव  यांनी  माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन, के पी. अ‍ॅडम, मंगेश पोडाला या कोरोना योद्धयांचा  पीपीई किट आणि हातमोजे वाटप करून गौरव केला.

ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देहूरोडमधील कोरोना मृतदेहांवर मोफत अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्याचे हे कार्य मानवतादी आहे. या कोरोना योद्धयांना यापुढेही पीपीई किट व अन्य प्रकारची मदत देहूरोड  कॅंटोन्मेंट बोर्ड आणि मावळचे आमदार  सुनील शेळके यांच्या माध्यमातून मिळून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे  आश्वासन काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड. कृष्णा दाभोळे यांनी दिले. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.