Dehuroad News : थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडल्यास गाठ मनसेसोबत – मोझेस दास 

एमपीसीन्यूज  :  वीज बिल माफीची घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडी  सरकारने आता ‘यु टर्न’ घेत वीज बिल माफी अशक्य असल्याचे सांगत घुमजाव केले आहे. कोरोना संकटामुळे आर्थिक परिस्थिती खालावलेल्या सर्वसामान्य जनतेला भरमसाठ रकमेचे बिल भरणे शक्य नाही. त्यामुळे  वीज बिलात सवलत द्यावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.  थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झालयास गाठ मनसेशी आहे, असा सूचक इशाराही मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास यांनी दिला आहे.  

यासंदर्भात  मावळ आणि देहूरोड शहर मनसेच्या शिष्टमंडळाने निगडी प्राधिकरण येथील महावितरण कार्यालयात आज, बुधवारी  निवेदन दिले. यावेळी  मनसे मावळ तालुका उपाध्यक्ष मोझेस दास, देहूरोड शहराध्यक्ष जॉर्ज दास, मावळ तालुका संघटक किरण गवळी, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष  मलिक शेख,  शहर उपाध्यक्ष  डॉमनिक दास आदी उपस्थित होते.

याबाबत माहिती देताना मोझेस दास म्हणाले, वीज बिल माफीच्या मागणीसाठी मनसे जिल्हा अध्यक्ष रवींद्र गारुडकर यांच्या मार्गदर्शनखाली महावितरणला निवेदन दिले आहे.   मार्च 2020 पासून कोरोना संकटामुळे राज्यातील जनता आर्थिक संकटात आहे.

त्यामुळे एप्रिल 2020 ते नोव्हेंबर 2020 या कालावधीतील सर्वसामान्य वीज ग्राहकांना देण्यात आलेली भरमसाठ रकमेची बिले भरणे अवघड आहे. या परिस्थितीत राज्याच्या  महाआघाडी सरकारने वीजबिल माफीची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेवर सरकारने ‘ यु टूर्न ‘ घेत वीजबिल माफी अशक्य असल्याचे सांगितले आहे. ही राज्यातील जनतेची घोर फसवणूक आहे.

सध्याचा काळात जनतेची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे वीज बिल भरणे त्यांना अशक्य आहे.  त्यामुळे संपूर्ण वीज बिल माफ करावी.  कोणत्याही वीज ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नये.  थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांना धमकावू  नये.  सध्याच्या संकटात महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनतेच्या पाठीशी आहे.  वीज बिल माफी  न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दास यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.