Dehuroad News : कॅंटोन्मेंट रुग्णालयात अपुऱ्या वैद्यकीय सुविधा; मनसेचा आंदोलनाचा इशारा

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे करदात्या नागरिकांना वैद्यकीय सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. कॅंटोन्मेंट बोर्डाच्या संकेथळावर ज्या सुविधा उपलब्ध असल्याचे दाखविण्यात येत आहे त्यातील फक्त किरकोळ स्वरूपाच्या सुविधा मिळत आहेत. अन्य सुविधा फक्त संकेतस्थळावर व कागदपत्रावरच असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. यावेळी मनसेचे मावळ तालुका उपाध्यक्ष किरण गवळी आणि विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष मलिक शेख उपस्थित होते. कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी निवदेन स्वीकारले.

मनसेच्या शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील सद्य परिस्थितीकडे कॅंटोन्मेंट प्रशासनाचे लक्ष वेधले. ओळख असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाते, तेही किरकोळ स्वरूपाचा आजार असल्यास. अन्य रुग्णांवर उपचार केले जात नाहीत.

संबंधित रुग्णांना इतर रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला जातो, याबाबत मनसेने नाराजी व्यक्त केली. तसेच एखादा गंभीर अपघात झाला किंवा कुणी दगावले असल्यास त्यांना तातडीने रुग्णवाहिकाही मिळत नाही. मृतदेह ठेवण्यासाठी आपल्याकडे शवगृह देखील नाही. त्यामुळे वैद्यकीय सुविधांअभावी स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर अनेक सुविधा उपलब्ध असल्याचे दिसते. प्रत्यक्षात मात्र, किरकोळ स्वरूपाच्या सुविधा मिळत आहेत. संकेतस्थळावर दिलेल्या सर्व वैद्यकीय सुविधा स्थानिक नागरिकांना उपलब्ध करुन द्याव्यात. याबाबत येत्या 15 पंधरा दिवसात कार्यवाही करावी; महाराष्ट्र नवनिर्माण सेना देहूरोड शहराच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

या संदर्भात कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल तसेच कार्यालायीन अधीक्षक राजन सावंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास ती या बातमीत समाविष्ट करण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.