Dehuroad News : ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा वाढवा- श्रीजीत रमेशन

कोरोना  रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज मोठ्याप्रमाणात  वाढली आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे.

 एमपीसीन्यूज :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्सिजन सिलेंडरची मागणी मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे. सध्याच्या कोरोना संकटकाळात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा, यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात रमेशन यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे कि, दिवसेंदिवस कोरोना  रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरची गरज मोठ्याप्रमाणात  वाढली आहे. परंतु, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे.

परिणामी येत्या काही दिवसांत परिस्थिती गंभीर होऊ शकते. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या व प्रकृती  गंभीर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरविण्यासाठी मोठी समस्या निर्माण होणार आहे.

तसेच अनेक रुग्णालयांमध्ये प्रकृती गंभीर असलेल्या व ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यास नकार दिला जात आहे. ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा हे या मागचे मुख्य कारण  आहे.

शिवाय कंपन्यांकडूनही ऑक्सिजन सिलेंडरची मागणी मोठ्याप्रमाणात वाढत आहे. त्याचाही परिणाम ऑक्सिजनचा तुटवडा होण्यात झाला आहे.  या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा पुरेसा  पुरवठा करण्याबाबत संबंधित विभागांनी लक्ष घालण्याची गरज असल्याचे  रमेशन यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.