Dehuroad News : समन्वयाचा अभाव! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश डावलून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी नवी नियमावली

एमपीसी न्यूज – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र वगळता पुणे जिल्ह्याच्या उर्वरित भागात कन्टोन्मेंट क्षेत्रासह जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश 15 जूनला सकाळी सात वाजेपर्यंत कायम राहणार आहे.

मात्र, या आदेशाला डावलून देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, नक्की कोणता आदेश पाळायचा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी 15 जूनपर्यंत लागू असणाऱ्या निर्बंधांसाठी सोमवारी आदेश काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड, सर्व नगरपालिका व ग्रामपंचायतींसाठी हा आदेश लागू राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या आदेशानुसार जिल्ह्यांतील महापालिका क्षेत्र वगळता अन्य भागातील अत्यावश्यक सेवा सोडून अन्य दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच ठेवावी लागणार आहेत. मेडिकल स्टोअर्स वगळता अन्य अत्यावश्यक सेवांची दुकाने सकाळी सात ते 11 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार आहेत.

कॅन्टोन्मेंट बोर्डचा देखील जिल्हा नियमावलीत समावेश होत असल्याने तेच नियम कॅन्टोन्मेंट बोर्डाला लागू होतात मात्र, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरुप हरितवाल यांनी महापालिका आदेशाचे अनुकरण करत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमानुसार कॅन्टोन्मेंट हद्दीत अत्यावश्यक सेवांमधील नमूद दुकाने ही आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहातील. तर, अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजपेर्यंत सुरू राहणार आहेत. रेस्टॉरंट व बार हे केवळ पार्सल व घरपोच सेवेसाठी सुरू राहतील. असे म्हटले आहे.

यामुळे कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, जिल्हाधिकारी यांनी काढलेला आदेश पाळायचा की देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओ यांनी काढलेला आदेश पाळायचा असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच, प्रशासकीय अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.