Dehuroad News : ‘लॉकडाऊनला विरोध नाही, जीएसटी व अन्य करांसह बँकांच्या हफ्त्यांमध्ये सवलत द्या’

देहूरोडमधील व्यापाऱ्यांची मागणी; लसीकरण वाढविण्याचा डॉक्टरांचा सल्ला

एमपीसीन्यूज : राज्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे कडक लॉकडाऊन लावण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. मात्र, गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यावेळी व्यापाऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत अथवा दिलासा मिळाला नाही. आता पुन्हा लॉकडाऊन होणार असेल तर व्यापाऱ्यांना जीएसटीसह अन्य कर आणि बँकांच्या हफ्त्यांमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी देहूरोडमधील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. तर कोरोना लसीकरण वाढविल्यास कोरोना साखळी तोडण्यात आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश येईल असे, डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

कडकडीत लॉकडाउनचा निर्णय घेण्याची सूचना टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिसवासांत राज्यात लॉकडाउनचा निर्णय घेणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. त्यावर लॉकडाऊनला विरोध नाही मात्र, विविध कर आणि बँकांच्या मासिक हफ्त्यांमध्ये सवलत देण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

विशाल खंडेलवाल ( किराणा व्यापारी, माजी नगरसेवक) म्हणाले, लॉकडाउनचा निर्णय सर्व समाज घटकांचा विचार करून घ्यावा. किराणा व्यापारी आणि नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून किमान तीन तास किराणा मालाची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी द्यावी. कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हाच एकमेव उपाय असेल तर मग तो कडकडीतच असायला हवा. तरच कोरोनावर नियंत्रण मिळवता येईल. तसेच नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन करावे. तसेच प्रशासनानेही कडक अंमलबजावणी करावी.

नीरज गुंदेशा ( मोबाईल विक्रेते) म्हणाले, आधीच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी कर्जबाजारी झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद ठेवूनसुद्धा जीएसटीसह सर्व प्रकारचे कर व्यापाऱ्यांना भरावे लागेल. त्यांनी ते प्रामाणिकपणे भरले. शिवाय दुकानातील चार ते पाच कामगारांचे पगारही दिले. घर, वाहन आणि अन्य कर्जाचे बँकांचे हफ्तेही भरले. आता पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. त्याला आम्ही विरोध करीत नाही. पण, व्यापाऱ्यांसाठी जीएसटीसह अन्य कर आणि बँकांच्या हफ्त्यांमध्ये सवलत द्यावी. अन्यथा व्यापारी उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत. शिवाय कोरोना प्रतिबंधक लसीकरणात व्यापाऱ्यांना प्राधान्य मिळणे गरजेचे आहे.

_MPC_DIR_MPU_II

डॉ. श्रीनिवास बन्सल ( बन्सल हॉस्पिटल) म्हणाले,  कडक लॉकडाउनपेक्षा कडक निर्बंध लावून नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याची सक्ती करणे गरजेचे आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी अमेरिका आणि इंग्लडच्या धर्तीवर लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे. अमेरिकेत ४० टक्के आणि इंग्लंडमध्ये ५० लसीकरण झाले. त्यामुळे तिथे कोरोना नियंत्रणात आहे. आपल्याकडे अद्याप १० टक्केसुद्धा लसीकरण झालेले नाही. ते ३० टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा कोरोना साखळी तोडण्यात यश येईल. कडक निर्बंध आणि लसीकरचा वेग वाढविणे यावर सरकारने भर देणे गरजेचे आहे.

डॉ. गणेश राऊत ( आधार हॉस्पिटल) म्हणाले, सध्या कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर बनल्याने लॉकडाऊनची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी जबाबदारी ओळखून कोरोनाबाबत शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करावे. कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. त्यातून ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेडची कमतरता, रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रत्येकासाठी हा काळ अतिशय कठीण आहे. प्रत्येक कोरोना बाधिताचा जीव वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणा, रुग्णालये, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने आपल्या जबाबदारीचे भान राखून नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. कडक लॉकडाऊनमुळे रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होणार आहे.

नकुल फाले ( रेडिमेड कपड्याचे व्यापारी) म्हणाले, कोरोना महामारी हे संपूर्ण जगावर आलेले आजपर्यंतचे सर्वात मोठे संकट आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी या पूर्वी संपूर्ण जगभरात लॉकडाऊन लागू केले होते. आताच विचार केला तर कोरोनाने उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे बेड न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णांना जीव गमवावा लागत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अशा परिस्थितीत कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन तोही कडकडीत हाच एकमेव उपाय आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर व्यापाऱ्यांना सरकरने मदत करावी. ती करताना केंद्र आणि राज्य सरकाराने व्यापाऱ्यांना सावरण्यासाठी सवलती जाहीर कराव्यात.

आशिष बन्सल ( किराणा व्यापारी) म्हणाले, कोरोनाची सद्य परिस्थिती पाहता लॉकडाऊनचा निर्णय योग्यच आहे. लॉकडाऊनला माझे पूर्ण समर्थन आहे. नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक खरेदीसाठी सहकुटुंब बाजारात येतात. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतो. काहीजण मास्क न वापरात बिनधास्त फिरत असतात. नागरिकांच्या अशा बेजबाबदार वागण्याने कोरोना वाढीला पोषक वातावरण निर्माण होत आहे. अशा वेळी कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊन लागू केल्यास तो कडकडीत असावा. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवाव्यात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.