Dehuroad News : आयुध निर्माणी वसाहतीचे सांडपाणी उघड्यावर; माहिती अधिकार कार्यकर्त्याची हरित लवादाकडे तक्रार

एमपीसीन्यूज : देहूरोड आयुध निर्माणी कारखान्याच्या वसाहतीमधील मलनिस्सारण प्रकल्पावरील यंत्रणा नादुरुस्त असल्याने दूषित, दुर्गंधीयुक्त सांडपाणी परिसरामध्ये उघड्यावर वाहत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संर्दभात माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे लेखी तक्रार केली आहे.

राष्ट्रीय हरित लवादाला पाठविलेल्या निवेदनात रमेशन यांनी म्हटले आहे की, देहूरोड येथे आयुध निर्माणी कारखान्यातील कामगारांची वसाहत आहे. या वसाहतीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांच्या घरातील मैला,सांडपाणी शुद्धीकरणासाठी असणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पावरील यंत्रणा गेली दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे दूषित व दुर्गंधीयुक्त सांडपाणी परिसरामध्ये उघड्यावर वाहत आहे.

या वसाहतीलगत जुना पुणे- मुंबई महामार्ग, देहूरोड बाजारपेठ आणि वसाहतीला लागून असलेल्या लोहमार्गालगत पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बापदेव नगर, श्रीनगर परिसरात नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत.

आयुध निर्माणी कारखान्याच्या वसाहतीमधील दुर्गंधीयुक्त सांडपाणी व दूषित पाणी बापदेव नगर परिरात उघड्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असताना ही आयुध निर्माणी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी लक्ष घालून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांनी राष्ट्रीय हरित लवादाला पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

महाराष्ट्र  प्रदूषण नियंत्रण  मंडळ आणि आयुध निर्माणी प्रशासनाकडेही निवेदनाच्या प्रती पाठविल्याची माहिती रामेशन यांनी दिली.

दरम्यान, या संदर्भात आयुध निर्माणी प्रशासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. आयुध निर्माणी प्रशासनाची प्रतिक्रिया उपलब्ध झाल्यास ती या बातमीत सामिवष्ट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.