Dehuroad News : सांगवडे गावात आकडा टाकून वीज चोरी; माहिती अधिकार कार्यकर्त्याची महावितरणकडे तक्रार

एमपीसीन्यूज : शहर आणि ग्रामीण भागात वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. एकीकडे नियमित वीज बिल भरूनही अनेकांना वीज पुरवठा अखंडित होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे काही महाभाग विद्युत तारांवर आकडे टाकून वीज चोरी करतात. मात्र, महावितरण अशा वीज चोरट्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. मावळ तालुक्यातील सांगवडे गावात विद्युत तारेवर आकडा टाकून वीज चोरी होत असल्याचा प्रकार माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी उघडकीस आणला आहे.

याबाबत रामेशन यांनी वीज चोरी होत असल्याच्या प्रकाराची छायचित्रासह थेट महावितरणच्या दक्षता अधिकाऱ्याकडे ईमेल द्वारे तक्रार केली आहे. वीज चोरीचा प्रकार गंभीर असून या प्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणीही त्यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.

_MPC_DIR_MPU_II

देहूरोड जवळील सांगवडे गावात एका बंगल्याच्या टेरेसवरून जवळच्या वीज वाहक तारांवर आकडा टाकून वीज चोरी सुरु असल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते रमेशन यांच्या निर्दशनास आले. त्यांनी तात्काळ हा प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर त्यांनी या वीज चोरीची थेट महावितरणच्या दक्षता अधिकाऱ्याकडे तक्रार केली. व्यावसायिक कारणासाठी ही वीज चोरी होत असल्याकडे लक्ष वेधत या प्रकरणी तातडीने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रमेशन यांनी केली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील वीज चोरीचा प्रकार गंभीर आहेच. त्याहून संबंधित गावातील महावितरणच्या वायरमन आणि संबंधित विभागातील महावितरणच्या अधिकाऱ्यांचे या वीज चोरीकडे होणारे दुर्लक्ष हाही गंभीर प्रकार आहे. त्यामुळे महावितरणने भरारी पथकांमार्फत वीज चोऱ्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर ज्या भागात असे प्रकार होतात, तेथील जबाबदार  अधिकाऱ्यांवरही कारवाई करणे गरजेचे आहे.

श्रीजीत रमेशन : माहिती अधिकार कार्यकर्ता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.