Dehuroad News : ‘अवकाळी’चा हरभरा आणि कांद्याला फटका; ज्वारी, गहू भुईसपाट

एमपीसीन्यूज : गुरुवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने देहूरोड पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने शेतीतील हरभरा, गहू, ज्वारी आणि कांद्याचे नुकसान केले. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्याच्या अनेक भागात गुरुवारी सायंकाळी अचानक मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने देहूरोड परिसरातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. शेलारवाडी, मामुर्डी, किन्हई, देहूगाव आदी भागातील शेतातील उभ्या पिकांना पावसाचा चांगलाच तडाखा बसला.

या आस्मानी संकटाने किन्हईच्या शिवारातील जोमात आला ऊस पूर्ण आडवा झाला. तर ज्वारी, गहू आणि हरभऱ्याचेही नुकसान झाले. कांदा पिकात पाणी साचून राहिल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले. काही ठिकाणी कांद्याचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे.

याबाबत अधिक माहिती देताना किन्हईचे शेतकरी संदीप गोंटे म्हणाले, गुरुवारी सायंकाळी पाच नंतर अचानक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. काही वेळात पावसाचा जोर वाढला. त्यानंतर ज्वारी, गहू भुईसपाट झाला. तर हरभरा आणि कांद्याच्या पिकात मोठ्याप्रमाणात पाणी साचले. आज दुसऱ्या दिवशीही पाण्याचा वापसा झालेला नाही.

शेतात जाणारे रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. एकूणच या आस्मानी संकटाने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. महसूल विभागाने तातडीने पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.