Dehuroad News : कॅंटोन्मेंट हद्दीतून बेकायदेशीररित्या दंड वसूल करण्यास महापालिकेला मनाई करा : श्रीजीत रमेशन

एमपीसीन्यूज : कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल देहूरोड कॅंटोमेंट बोर्ड कार्यक्षेत्रातील सार्वजनिक आणि दुकानदारांकडून दंड वसूल केला जात आहे. मात्र, दंडाची पावती कॅंटोन्मेंट ऐवजी पिंपरी चिंचवड महापालिकेची दिली जात आहे. कॅंटोन्मेंट हद्दीतून महापालिका प्रशासनाला दंड वसूल करण्यास मनाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

या संदर्भात रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन पाठविले आहे. कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि दुकानदारांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.

या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती किंवा दुकानदारांना दंडाची पावती दिली जाते. मात्र, देहूरोड कॅंटोन्मेंट हद्दीत कारवाई केल्यानंतर कॅंटोन्मेंट बोर्डाची पावती देणे अपेक्षित असतात ती पिंपरी चिंचवड महापालिकेची दिली जात आहे. हा सर्व प्रकार चुकीचा असल्याचे रमेशन यांनी सांगितले.

त्याचबरोबर सध्या देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे हद्दीतील कारवाईत वसूल केलेल्या दंडाची रक्कम कॅंटोन्मेंट बोर्डाकडे जमा होणे गरजेचे आहे. मात्र, कॅंटोन्मेंट हद्दीतील कारवाईचा दंड पिंपरी चिंचवड महापालिका बेकायदेशीररीत्या वसूल करीत असल्याकडे रमेशन यांनी लक्ष वेधले.

नियमांनुसार महापालिका प्रशासन आपल्या हद्दीबाहेर बेकायदेशीर दंड वसूल करू नये याबाबत महापालिका आणि पोलिसांना आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी निवेदनात केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.