Dehuroad News : माहिती अधिकार कार्यकर्त्याने रोखली मृत तरुणीची बदनामी ; पोलिसांकडे केली कारवाईची मागणी

एमपीसीन्यूज : हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या निषधार्थ देहूरोड येथे सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी निषेध सभा, श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, या साठी लावलेल्या फ्लेक्सवर पीडित तरुणीऐवजी अन्य मृत तरुणीचा फोटो वापरल्याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार करुन चुकीचा फोटो लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, रमेशन यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन संबंधित फ्लेक्स काढून टाकला.

उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले आहेत. देशभर या घटनेचा निषेध करण्यासाठी महिला आणि नागरिक निदर्शने करीत आहेत.

मात्र, या निषेध आंदोलनात वापरला जाणारा फोटो हा पीडित तरुणीचा नसून चंदीगड येथे दोन वर्षांपूर्वी दुर्धर आजाराने मुत्यू झालेल्या तरुणीचा असल्याचे तिच्या कुटुंबियांनी  म्हटले आहे. आंदोलनात या तरुणीचा फोटो वापरला जात असल्याबाबत तिच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबतचे वृत्त ‘एमपीसीन्यूज’ने प्रसिद्ध केले होते.

सोशल मीडिया तसेच आंदोलकांकडून वापरण्यात येणारा फोटो हा पीडितेचा नसल्याचे रमेशन यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. देहूरोड येथील आंदोलनात चंदीगड येथील मनीषा यादव या मृत तरुणीचा फोटो वापरण्यात आला होता.

रमेशन यांनी स्वतः आंदोलन स्थळी जाऊन तो फ्लेक्स काढून टाकत मनीषा यादव या तरुणीची बदनामी रोखली.

तसेच केंद्र सरकार व न्यायालयाकडून बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात पीडितेची ओळख सार्वजनिक न करण्याचे आदेश असतानासुद्धा या आदेशाची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कलम 228( अ )नुसार कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रमेशन यांनी पत्राद्वारे देहूरोड पोलिसांना केली आहे.

दरम्यान, देहूरोड येथे श्रद्धांजली आणि निषेध आंदोलन करणाऱ्या राजकीय पक्ष आणि संघटनांकडून या रमेशन यांनी केलेल्या तक्रारीबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. संबंधितांकडून प्रतिक्रिया आल्यास ती या बातमीत वापरण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.