Dehuroad News : वाढदिवसाचा खर्च टाळून शाळेसाठी अडीच लाखांची मदत; कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षाने जपली सामाजिक बांधिलकी

यंदा कोरोना संकटामुळे वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय रघुवीर शेलार यांनी घेतला.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शेलारवाडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेसाठी पाच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अडीच लाखांचा धनादेश कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजय खन्ना यांच्याकडे आज, शुक्रवारी सुपूर्द केला.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल, अप्पर पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार गीता गायकवाड,  बोर्ड सदस्य हाजीमलंग मारीमुत्तू, विशाल खंडेलवाल, ललित बालघरे, गोपाळ तंतरपाळे, सदस्या ॲड. अरुणा पिंजण, सारिका नाईकनवरे, सदस्य कर्नल चित्तरंजन आणि पल्लव सूद कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत, अधिकारी विक्रम जाधव, दीपक अडसूळ आदी उपस्थित होते.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक एकचे नेतृत्व करणाऱ्या रघुवीर शेलार यांनी निवडून आल्यापासून आपल्या वॉर्डात विकासकामांचा धडका लावला. वेळप्रसंगी अनेक विकासकामे त्यांनी स्व:खर्चातून केली आहेत. त्यामुळे दरवर्षी त्यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला जातो.

मात्र, यंदा कोरोना संकटामुळे वाढदिवस साजरा करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय रघुवीर शेलार यांनी घेतला.

त्यानुसार त्यांनी शेलारवाडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी पाच लाखांची मदत करण्याचा निर्णय घेतला.

तसेच या निर्णयाची त्वरित अंलबजावणी करीत पहिल्या टप्प्यात अडीच लाखांच्या मदतीचा धनादेश बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर संजय खन्ना यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांच्या या कार्याचे देहूरोड शहर आणि पंचक्रोशीत कौतुक केले जात आहे.

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने बोर्डाचे  उपाध्यक्ष  शेलार यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला. तसेच कार्यकर्त्यांनाही गरजू व्यक्ती आणि कुटुंबांना मदत करण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची व इतरांची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केल्या  आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.