Dehuroad News : संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने इयत्ता नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तक संचांचे वाटप

एमपीसी न्यूज – गेली 25 वर्ष संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र देहू नगरीमध्ये लाखो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येत असते. परंतु गेली दोन वर्ष कोरोनाच्या संकटकाळात पालखी सोहळा अगदी मर्यादित स्वरूपात होत आहे. त्यामुळे संत तुकाराम अन्नदान मंडळ गेली दोन वर्ष महाप्रसाद वाटपाच्या खर्चाच्या रक्कमेचा विनियोग विधायक कार्यासाठी करीत आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेक गोरगरीब कुटुंबांना दररोजचे जगणे देखील मुश्किल होत आहे. त्यातच पेट्रोल-डिझेल सह जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले असून महागाईने सर्वसामान्य माणसांसाठी जगणे अत्यंत बिकट केले आहे. अशा या परिस्थितीत मुला-मुलींचे शिक्षण सुरू ठेवणे देखील गोरगरिबांसाठी तारेवरची कसरत होत आहे. गरीब,गरजवंत, कष्टाळू व होतकरू मुला-मुलींना शिक्षणासाठी थोडेफार का होईना सहकार्य व्हावे या हेतूने श्रीक्षेत्र देहू येथील रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालय व संत जिजाबाई कन्या विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या मुला-मुलींना संपूर्ण पुस्तकांचा संच व कंपास पेटींचे वाटप करण्यात आले.

पुस्तक वाटपाचा कार्यक्रम संत जिजाबाई कन्या विद्यालयात येथे संपन्न झाला. संत तुकाराम अन्नदान मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बुचडे, सचिव सुनील कंद, खजिनदार प्रशांत भालेकर, संचालक संदीप शिंदे, प्रकाश भोसले तसेच संत तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य प्रल्हाद यादव, पर्यवेक्षक पोपट मोरे, कन्या विद्यालयाच्या प्राचार्या वडाळकर मॅडम, पर्यवेक्षक आनंदराव तांबे व शिक्षकांच्या शुभहस्ते एकूण 40 मुला-मुलींना पुस्तक संचांचे वाटप करण्यात आले.

मागील वर्षी संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या वतीने श्रीक्षेत्र देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून दीड लाख रुपयाचा बॅटरी बॅकअप संच भेट देण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी पुढाकार घेऊन देहू पंचक्रोशीसाठी शासनाने सुरू केलेल्या कोवीड सेन्टर करिता एक लाख रुपयाचा निधी डॉ. यादव सरांकडे सुपूर्त करून सुमारे 500 अ‍ॅंटीजेन किट खरेदी करण्यात आले होते.

संत तुकाराम विद्यालयाचे प्राचार्य यादव व संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या प्राचार्या वाढवकर मॅडम यांनी मुला-मुलींना पुस्तकांचे वाटप केल्याबद्दल संत तुकाराम अन्नदान मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करीत भविष्यात देखील आपल्या गावातील शाळांच्या विविध उपक्रमांना आपणाकडून सहकार्य लाभेल आशा भावना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.