Dehuroad News : मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देहूरोड काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम

एमपीसीन्यूज : केंद्रातील मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देहूरोड ब्लॉक काँग्रेसने आक्रमक पवित्र घेतला आहे. या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी शहर काँग्रेसने देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील शेतकरी, सवर्सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांच्या सह्यांची मोहीम राबविण्यास आजपासून प्रारंभ करण्यात आला.

देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड बाजारपेठेतील ऐतिहासिक सुभाष चौक येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष व नगरसेवक हाजिमलंग मारीमुत्तू यांच्या हस्ते पटले आणि गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

दरम्यान, हा दिवस किसान अधिकार दिवस म्हणून पाळण्यात आला. उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी काळ्या कायद्याला जोरदार विरोध दर्शविण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, कार्याध्यक्ष दीपक सायसर, जिल्हा महिला सदस्या राणी पांडीयण, महिला शहराध्यक्ष ज्योती वैरागर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष मिकी कोचर, अल्पसंख्यांक सेलचे मावळ तालुका अध्यक्ष गफूरभाई शेख, सरचिटणीस गोपाळ व्यंकोबा राव, युवा नेते सायबू तेलगू, योगेश टाकळकर,अल्पसंख्यांक सेलचे सुभान शेख, रेणू रेड्डी तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी व पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार केंद्राच्या शेतकरी विरोधी कायद्याला विरोध करण्यासाठी देहूरोड शहरातील व्यापारी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची सह्यांची मोहिम सुरु करण्यात आली आहे. देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीतील सातही वॉर्डातील कार्यकर्त्यांना आपापल्या भागामध्ये सह्यांची मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातून या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळेल. हाजिमलंग मारीमुत्तू – काँग्रेस शहराध्यक्ष व नगरसेवक. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.