Dehuroad News : व्यवसाय शुल्क अपहरप्रकरणी कॅंटोन्मेंट कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

अन्य एकाची अभियांत्रिकी खात्यात सुरक्षा रक्षक म्हणून बदली

एमपीसीन्यूज : कॅंटोन्मेंट हद्दीतील पथ विक्रेत्यांकडून तात्पुरते व्यवसाय शुल्क वसुलीमध्ये पैशांचा अपहार करणाऱ्या एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांची अभियांत्रिकी खात्यात सुरक्षा रक्षक म्हणून बदली करण्यात आली. या दोन्ही कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधीक्षक राजन सावंत यांनी दिली.

कॅंटोन्मेंट हद्दीतील पथ विक्रेत्यांकडून तात्पुरते व्यवसाय शुल्क वसुली करणाऱ्या अजय राय या कर्मचाऱ्याकडून पैशांचा अपहार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता.

तसेच संबंधित कर्मचाऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करीत रक्षा संपदा महानिदेशनालय, नवी दिल्ली येथे तक्रार केली होती. या तक्रारीची तात्काळ दखल घेत कारवाई करण्याचे आदेश रक्षा संपदा महानिदेशनालयाकडून देण्यात आले होते. त्यानुसार अजय राय या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली, तर विजय नेटके याची अभियांत्रिकी खात्यात सुरक्षा रक्षक म्हणून बदली करण्यात आली.

दरम्यान, कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांकडून तात्पुरते व्यवसाय शुल्क वसूलच्या नावाखाली हातगाडी, पथारी विक्रेत्यांना पावती न देता पैसे गोळा करून बोर्ड प्रशासनाची फसवणूक केली जात असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास यांनीही कॅंटोन्मेंट बोर्डाकडे केली होती. तसेच पैशांचा अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्याची चौकशी करुन दोषी आढळलयास कठोर कारवाई करण्याची मागणी दास यांनी केली होती.

त्यानंतर बोर्ड प्रशासनाकडून दोन्ही कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याने मनसे शहराध्यक्ष दास यांनी समाधान व्यक्त केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.