Dehuroad News : रुग्णांची लूट करणाऱ्या बोगस पॅथॉलॉजी लॅबवर कारवाई करा : श्रीजीत रमेशन

एमपीसीन्यूज : देहूरोड शहर आणि परिसरातील बोगस पॅथॉलॉजी लॅब आणि तिथे कार्यरत असलेल्या बोगस पॅथॉलॉजिस्ट यांच्यावर कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे. रोगनिदानामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब, तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्ट, स्वाक्षरी करणाऱ्या तज्ज्ञांसह अन्य पूरक माहितीबाबत सर्वेक्षण करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

यासंदर्भात रमेशन यांनी देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त  तसेच राज्याच्या आरोग्य विभागाला निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की महाराष्ट्र पॅरावैद्यक अधिनियमन्वये तयार केलेल्या व ठेवलेल्या राज्य नोंदवहीत नोंद असलेल्या वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान परिषद नोंदणी क्रमांक व प्रमाणपत्र देते.

या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस पॅरावैद्यक व्यावसायिक म्हणून स्वतंत्रपणे वा पॅथोलॉजी, कार्पोरेट लॅबमधे तंत्रज्ञ म्हणून व्यवसाय वा काम करता येत नाही.

तरीही महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद अनुसुचीमध्ये समाविष्ट मान्यताप्राप्त मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजी पदवी, पदविका नसताना व महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद नोंदणी नसताना अनेकजण राज्यात क्लिनिकल लॅबोरेटरी थाटून वा कार्पोरेट पॅथ लॅबचे रक्त नमुने संकलन करणारे तंत्रज्ञ म्हणून घरोघरी जाउन रक्ताचे नमुने घेतात व अवास्तव शुल्क आकारणी करतात. तसेच महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषद व कायद्याचे उल्लंघन करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे.

यात कार्पोरेट पॅथोलॉजी लॅबोरटरिज व बऱ्याच एमडी पॅथोलॉजी डॉक्टर हे अप्रशिक्षित व महाराष्ट्र पॅरावैद्यक परिषदेची नोंदणी नसलेल्या व्यक्तींना कमिशन देउन अशा बोगसगिरीला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक नुकसान आणि चुकीच्या उपचारांना बळी पडावे लागत असल्याचा आरोप रमेशन यांनी केला आहे.

देहूरोडमध्ये किवळे, मामुर्डी, आदर्शनगर, मेन बाजार या परिसरात सुमारे 16 लॅबोरेटरी आहेत. या सर्व ठिकाणी आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे आहे. तिथे कार्यरत असलेल्या तंत्रज्ञांकडे आवश्यक शैक्षणिक अहर्ता आणि पदवी प्रमाणपत्र आहेत कि नाहीत याची खातरजमा करण्याची मागणी रमेशन यांनी केली आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पत्रकान्वये सर्व पॅथोलॉजी लॅबचे सर्वेक्षण करून बोगस लॅबवर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु, केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे राज्यभरात बोगस लॅबचा सुळसुळाट झाला आहे. अनेकदा तंत्रज्ञांकडून लॅब चालविली जात असल्याने तिथे होणाऱ्या विविध चाचण्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.