Dehuroad News :रुग्णांऐवजी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्डियाक रुग्णवाहिकेचा वापर: माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आरोप

सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात या रुग्णवाहिकेचा वापर हा कोरोना रुग्णांसाठी होणे अपेक्षित आहे.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयाच्या कार्डियाक रुग्णवाहिकेचा वापर रुग्णांऐवजी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि फर्निचर वाहतुकीसाठी केला जात आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असून यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर त्वरित  कारवाई,  अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजीत रमेशन यांनी केली आहे.

याबाबत रमेशन यांनी देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल यांना ईमेलद्वारे तक्रार केली आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतील रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सोयीसुविधांयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. सध्याच्या कोरोनाच्या संकट काळात या रुग्णवाहिकेचा वापर हा कोरोना रुग्णांसाठी होणे अपेक्षित आहे.

मात्र, रुग्णांऐवजी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि फर्निचर वाहतुकीसाठी केला जात आहे. त्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.

_MPC_DIR_MPU_II

तसेच रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना अन्य ठिकाणच्या खासगी रुग्णवाहिकेचा पर्याय सुचविला जाते. खासगी रुग्णवाहिकेसाठी रुग्णांना साडे पाच ते 12 हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.

कोरोना संकट काळात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिकेचा वापर करणे योग्य नाही. त्यामुळे या प्रकरणात स्वतः लक्ष घालून दोषी असणाऱ्यांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी रमेशन यांनी निवेदनात केली आहे.

त्याचबरोबर या कार्डियाक रुग्णवाहिकेचे संचालन करण्यासाठी तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर नाही हे दुर्दैव आहे. शिवाय या  रुग्णवाहिकेचे फिटनेस बाद झाले असल्याकडेही रमेशन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी हरितवाल यांचे लक्ष वेधले आहे.

कॅन्टोन्मेंट रुग्णालयाकडे कार्डियाक रुग्णवाहिका नसून साधी रुग्णवाहिका आहे. ती कार्डियाक रुग्णवाहिका म्हणून देण्यात आली असली तरी या रुग्णवाहिकेसाठी आवश्यक असणारी सुसज्ज यंत्रणा, तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी अद्याप उपलब्ध केलेले नाहीत. रुग्ण नसताना वरिष्ठांच्या परवानगीने जवळच्या अंतरासाठी  कोरोनाच्या होम आयसोलेशन रुग्णांना भेटी देण्यासाठी रुग्णवाहिका वापरली जाते.  महात्मा गांधी कोविड सेंटर  उभारणीच्यावेळी म्हणजेच एप्रिलमध्ये फक्त एकदाच कोविड सेंटरसाठी आवश्यक साहित्य या सध्या रुग्णवाहिकेमधून नेण्यात आले होते. त्यामुळे रुग्णवाहिकेचा गैरवापर केला जातो यात तथ्य नाही. या प्रकरणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होणारा व्हिडीओ जुना आहे. तो तपासून पाहण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या अहवालानुसार व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. रुग्णवाहिकेचा वापर रुग्णांसाठीच केला जात आहे. मात्र, काही मंडळी कोरोना मृतदेह नेण्यासाठी या रुग्णवाहिका मिळावी म्हणून हट्ट धरतात. कोविडच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ते अत्यंत चुकीचे आहे.

डॉ. सुनीता जोशी – निवासी वैद्यकीय अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, देहूरोड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.