Dehuroad News: देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी

एमपीसी न्यूज – देहूरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या त्रिसदस्य समितीसाठी एका नामनिर्देशित सदस्य प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. केंद्र सरकार ही सदस्याची नियुक्ती करीत आहे. 19 मार्चपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश रक्षा संपदा महानिदेशालयाने कँटोन्मेंट बोर्ड प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

देशातील 56 कँटोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांची मुदत नुकतीच संपल्याने बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे. जोपर्यंत निवडणूक होत नाही. तोपर्यंत कॅटोन्मेंट अॅक्ट 2006 अन्वये कॅटोन्मेंट बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर, बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एक नामनिर्देशित सदस्य असे तीन जणांच्या समितीद्वारे होतो.

नामनिर्देशित सदस्य केंद्र सरकारद्वारे नियुक्त केला जातो. सदस्यत्वासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. छाननी केलेले अर्ज दक्षिण विभागाच्या मुख्यालयात पाठविण्यात येतील.

अंतिम निवडीसाठी हे अर्ज संरक्षण विभागाकडे पाठविण्यात येतील. त्यानंतर संरक्षण विभागाच्या महानिदेशकांद्वारे अंतिम निवड होणार आहे, असे देहूरोड कॅटोन्मेंट बोर्डाचे कार्यालयीन अधिक्षक राजन सावंत यांनी सांगितले.

देहूरोड शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी कॅटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नामनिर्देशित सदस्यपदासाठी कॅंटोन्मेंट हद्दीत ज्या पक्षाचा खासदार आहे त्यांची शिफारस यापूर्वी विचारात घेतली जात होती.

शिवसेना, भाजपकडून मोर्चेबांधणी  

देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हे मावळ लोकसभा मतदारसंघात येते. या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे हे खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांनी संधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार असल्याने स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनीही संधी मिळण्यासाठी प्रयत्न केलेले सुरू केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.