Dehuroad News : भाविकांची गैरसोय दूर; घोरावडेश्वर डोंगरावर स्वच्छतागृहाची व्यवस्था

एमपीसीन्यूज : श्री घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने व आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्टस् अँड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांच्या श्रमदानातून  शेलारवाडीजवळील घोरावडेश्वर डोंगर येथे स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

शेलारवाडी ( ता. मावळ) येथे जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत उंच डोंगरावर श्री क्षेत्र घोरावडेश्वर देवस्थान आहे. येथे वर्षाचे बाराही महिने शिवभक्तांसह पर्यटकांची वर्दळ असते. महाशिवरात्रीला लाखो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मात्र, उंच डोंगरावर असलेल्या या देवस्थान परिसरात स्वच्छतागृहाचा अभाव होता. त्यामुळे भाविकांची विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत होती.

या पार्श्वभूमीवर श्री घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानच्या वतीने या डोंगरावर स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार फायबरचे स्वच्छतागृह उपब्लध करण्यात आले. मात्र, ते डोंगरावर नेणे जिकरीचे होते.

दरम्यान, आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्टस् अँड सायन्स महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून हे फायबरचे स्वच्छतागृह घोरावडेश्वर डोंगरावर नेण्यात आले. याकामी घोरावडेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मदतीचा हातभार लावला.

घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष व देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार, विश्वस्त भाऊसाहेब पानमंद, सचिव योगेश शेलार, मधुकर बोडके, विजय भोंडवे आदी उपस्थित होते.

यासाठी डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ कॉमर्स, आर्टस् अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन वामन, फुंदे, तिवारी, खलिद तसेच वन विभागाचे सोमनाथ ताकवणे, भारतीय पुरातत्व विभागाचे मुंढावरे, व तळेगाव दाभाडेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.