Dehuroad News: घोरावडेश्वर डोंगरावर वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते वड पूजन, वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्गमित्र विभागातर्फे वटपौर्णिमेनिमित्त दरवर्षीप्रमाणे घोरावडेश्वर डोंगरावर वडाचेपूजन व वृक्षारोपण करण्यात आले. गेली दहा वर्ष सलग डोंगरावर पूर्वी महिलांनीच लावलेल्या वडांचे पुजन व नवीन झाडे लाऊन आगळ्या वेगळ्या पध्दतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते.

भास्कर रिकामे यांनी प्रास्ताविक करताना उपस्थितांना हरित घोरावडेश्वर प्रकल्पाची व उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, “आपले सर्व हिंदु सण उत्सव व परंपरा या निसर्गातील सर्व पशू, पक्षी, वृक्ष, वेली किंबहुना सर्व निसर्गाच्या रक्षणासाठी पुरक आहेत. वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्राणवायू देणाऱ्या वडाची पुजा करुन त्याचे रक्षण करावे, वडाच्या सानिध्यात काही काळ व्यतीत करावा हा मुळ उद्देश या उत्सवात आहे.”

परंतु, हल्ली शहरामध्ये वडाच्या झाडाची तोड करून फांद्यांची पुजा केली जाते, यामुळे वडाचे पुजन करून संवर्धन करण्याऐवजी कत्तल केली जाते. ही बाब परंपरा व पर्यावरण दोन्हींच्या दृष्टीने चुकीची आहे. त्यामुळे आपापल्या परिसरात असलेल्या वडाची पुजा करावी किंवा वडाच्या रोपांची पूजा करुन ते झाड लावावे. प्रसंगी झाडाच्या प्रतिमेची पूजा करावी परंतु कोणत्याही परिस्थितीत तोडलेल्या फांद्यांची पूजा करु नये, याविषयी सर्वांनी जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी प्रा. निता मोहिते, माधुरी मापारी, वैशाली जोशी, सविता कामथे, जयश्री मनकर, मानसी म्हस्के, अमृता दाते, नंदा राऊत, डॉ. वसुंधरा रिकामे-संभुस आदी उपस्थित होत्या. विजय सातपुते, मनेश म्हस्के, रवी मनकर, अभिषेक कामथे, संतोष पाटील, दिपक नलावडे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

शारदा रिकामे यांनी पौराहित्य केले, पर्यावरण संरक्षण प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.