Dehuroad : एक लाख बौद्ध अनुयायी देहूरोड येथे करणार ‘महाबुद्धवंदना’

एमपीसी न्यूज – देहूरोड येथे 25 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दरवर्षी 25 डिसेंबर रोजी बौद्ध अनुयायी एकत्र जमतात.  यावर्षी देहूरोड येथे एक लाख बुद्ध अनुयायी महाबुद्धवंदना करणार आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली आहे.

देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर बुधवारी (दि. 25) सकाळी साडेदहा वाजता महाबुद्धवंदना होणार आहे. यावेळी संपूर्ण देशातून बौद्ध अनुयायी एकत्र येणार आहेत. एक लाख बौद्ध अनुयायी महाबुद्धवंदना करणार आहेत. तसेच या धम्मपीठावर 500 पेक्षा अधिक भिक्खू येणार आहेत. परिसरातील नागरिकांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवडचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे यांनी कार्यक्रम स्थळाची पाहणी केली आहे. बुधवारी या मार्गावरील वाहतूक देखील वळविण्यात आली आहे.

बुद्ध काळाच्या प्रभावाने नंतर सुमारे बाराशे वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलेले देहूरोड येथील हे बुद्ध विहार अद्वितीय ठरलेले आहे. डॉ. बाबासाहेबांना डोळे बंद करून एकाच ठिकाणी बसलेले तथागत बुद्ध अभिप्रेत नव्हते. त्यासंबंधी ते म्हणतात, ‘तथागत बुद्ध देशाच्या कानाकोपऱ्यात अखंडपणे डोळे उघडे ठेवून आयुष्यभर फिरत राहिले, जगाचे दुःख त्यांनी डोळसपणे पाहिले आणि त्यांचे हे भ्रमण पायी चालत असे. त्यांनी कधीही वाहन अथवा साधन प्रवासासाठी वापरले नाही. डॉ. बाबासाहेबांना डोळे उघडे असलेले तथागत बुद्ध अपेक्षित होते.

रंगून येथे अशीच डोळे उघडे असलेली बुद्धाची मूर्ती बाबासाहेबांना मिळाली. त्याच मूर्तीची देहूरोडच्या विहारात स्थापना करण्यात आलेली आहे. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘ही ऐतिहासिक घटना फार महत्त्वाची असून या घटनेची नोंद इतिहासात होईल आणि या लहान बुद्ध मंदिरापासून धम्मक्रांतीला सुरुवात होईल’ असे उद्गार काढले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.