Dehuroad : संकटकाळात मदतीऐवजी आंदोलन करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही : रमेश जाधव

एमपीसीन्यूज : कोरोना सारख्या विषाणूविरोधात संपूर्ण जगात एकजूट झाली आहे. आपल्या देशात आणि राज्यातही कोरोचा लढा सुरु आहे. अशा संकट काळात सरकार आणि सर्व कोरोना योद्धयांना साथ देण्याऐवजी निषेधाचे आंदोलन करणाऱ्या भाजपला जनता कदापि माफ करणार नाही, अशा शब्दांत शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी भाजपवर शरसंधान साधले.

कोरोनाला प्रतिबंध करण्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला अपयश आल्याच्या आरोप करीत आज, शुक्रवारी भाजपच्या वतीने काळे मास्क लावून राज्यभर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मावळ तालुक्यातही राज्य सरकारविरोधात भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र बचाव आंदोलन केले.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने तालुका समन्वयक रमेश जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. याबाबत जाधव म्हणाले, सर्व जग विषाणूशी योध्दा समजून लढत आहे. कोरोनाला हद्दपार कारण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली आहे. यात आपला हिंदुस्थानसुध्दा आपली ताकद लावत आहे.

महाराष्ट्रही सर्वताकदीनीशी या महामारीचा सामना करीत आहे. या लढाईत अबालवृद्ध सरकारसोबत आहेत. प्रत्येकजण आपल्याला जमेल ती मदत करीत असताना भाजपाची मंडळी आंदोलन करून त्यात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका जाधव यांनी केली आहे.

सत्तेशिवाय त्यांना खूप त्रास होत आहे. म्हणून ते आंदोलन करायला उतरले आहेत. मात्र, भविष्यात भाजपाला त्याचा परिणाम नक्की भोगावा लागेल. जनता त्यांना कधीच माफ करणार नाही, असा इशारा जाधव यांनी दिला आहे.

भाजपाला आंदोलनाचा नैतिक अधिकार आहे काय ?

दरम्यान, देहूरोड येथे भाजपने केलेल्या आंदोलनानंतर शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू यांनी भाजपवर टीकेचे बाण सोडले. महाराष्ट्र आणि देहूरोड शहर व परिसर कोरोना सारख्या महामारीच्या संकटात असताना देहूरोडमधील भाजपाने ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन केले. देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपाची सत्ता असताना बोर्डाच्या तिजोरीत खडखडाट झाला.

कामगारांचे वेतन देण्यास बोर्डाच्या तिजोरीत एक दमडी राहिली नाही. संपूर्ण शहर कोरोनाच्या विळख्यात अडकले होते तेंव्हा कुठे गेले होते भाजपाचे कार्यकर्ते, असा सवाल नायडू यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्र सरकारसह वैद्यकीय आणि आरोग्याशी निगडित लाखो कर्मचारी कोरोनाविरुद्ध अहोरात्र लढा देत आहेत. कोरोना महामारीच्या संकटात देहूरोडच्या नागरिकांना भाजपाने साथ दिली नाही. त्यामुळे भाजपाला राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार आहे का, याचे आत्मपरीक्षण करावे, असा खोचक सल्लाही नायडू यांनी भाजपाला दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.