Dehuroad Crime : देहूरोड परिसरात पिंपरी-चिंचवड पोलिसांचा दोन ठिकाणी छापा; 200 लिटर ताडी, 12 बिअरच्या बाटल्या जप्त

एमपीसी न्यूज – मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड पोलिसांचे छापासत्र जोरात सुरु आहे. दररोज वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून पोलीस दारूसाठा जप्त करीत आहेत. गुन्हे युनिट पाचच्या पोलिसांनी देहूरोड परिसरात एका हॉटेलवर छापा मारून 12 बिअरच्या बाटल्या जप्त केल्या. तर देहूरोड पोलिसांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारून 200 लिटर ताडी जप्त केली.

गुन्हे शाखा युनिट पाचने केलेल्या कारवाईत विष्णू रामपोलो दास (वय 24), हरी रामपोलो दास (वय 19, रा. रावेत), महेश उर्फ सिद्धार्थ नागनाथ माडेकर (रा. संभाजीनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विष्णू आणि हरी हे दोघे रावेत येथील मुनलाइट हॉटेलमध्ये आरोपी महेश याच्या सांगण्यावरून दारू विक्री करीत होते. पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून दोन हजार 40 रुपये किमतीच्या 12 बिअरच्या बाटल्या जप्त केल्या.

देहूरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये अरबाज हुसेन तलफदार (रा. ओटास्कीम, निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी देहूगाव-तळेगाव रोडवर एका पत्र्याच्या शेडमध्ये ताडी दारू विक्री करीत होता. पोलिसांनी छापा मारून चार हजार रुपये किमतीची 200 लिटर ताडी जप्त केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून गेला. दोन्ही गुन्ह्याचा तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.