Dehuroad : देहूरोड पोलिसांनी केले रावण टोळीच्या म्होरक्याला जेरबंद

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील कुख्यात रावण टोळीच्या म्होरक्याला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त केली आहे.

चिम्या उर्फ अमोल निजाप्पा गायकवाड (रा. जाधववस्ती, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद निजाप्पा गायकवाड याच्या रावण टोळीने पिंपरी-चिंचवड शहरातील रावेत, काळेवाडी, आकुर्डी, निगडी, वाकड या भागात मागील चार ते पाच वर्षांपासून उच्छाद मांडला होता. या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पोलिसांनी विनोद गायकवाड आणि त्याच्या साथीदारांवर मोक्काची कारवाई करून त्याची कारागृहात रवानगी केली.

विनोदची कारागृहात रवानगी झाल्यानंतर त्याचा भाऊ चिम्या गायकवाड याच्यावर देखील मोक्काची कारवाई झाली. मात्र, चिम्या मागील काही दिवसांपासून भूमिगत राहून ससा गायकवाड, सोन्या जाधव, नझीम व अन्य साथीदारांना घेऊन टोळी चालवत होता. तो मंगळवारी (दि. 19) देहूरोडजवळ चिंचोली गावाजवळ येणार असल्याची माहिती देहूरोड पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला अटक करण्यात आली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तुल मिळाले. चिम्या 2017 पासून मोक्कामध्ये फरार होता.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गज्जेवार, उपनिरीक्षक जगताप, गायकवाड पोलीस कर्मचारी शाम शिंदे, प्रीतम वाघ, राजेश कुरणे, परदेशी, खोमणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.