Dehuroad : जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेत सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलला यश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र राज्य कलासंचालनालय मुंबई व जिल्हा परिषद (शिक्षण विभाग) पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये देहूरोड येथील सेंट जॉर्ज इंग्लिश स्कूलच्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी नुरफशा अब्दुल पिंजारी हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला.

पीसीआरए भारत पेट्रोलियम मंत्रालय नवी दिल्ली आयोजित राष्ट्रीय पातळीवरील ‘इंधन वाचवा’ या विषयावरील चित्रकला स्पर्धेत अंकिता प्रभुलिंग मुगदे व मधुरा विशाल तलरेजा या दोन विद्यार्थिनींना राष्ट्रीय स्तरावर उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. याबद्दल दोन्ही विद्यार्थिनींना पाच हजार रुपयांचे बक्षीसही मिळणार आहे.

मिळालेल्या यशाबद्दल बालचित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात नुरफशा अब्दुल पिंजारी आणि शाळेचे कलाशिक्षक श्रीकांत बाळासाहेब जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बक्षीस वितरण समारंभासाठी शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे, प्रसिद्ध व्यंगचित्रकार मुकीम तांबोळी, कला शिक्षक संघाचे संस्थापक खान चाचा, अध्यक्ष किरण सरोदे, सचिव किरण, मिलिंद शेलार आदी उपस्थित होते.

चित्रकला स्पर्धेसाठी श्रीकांत जाधव यांनी तयारी करून घेतली. कलाशिक्षक जाधव यांनी वर्षभर शालेय स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन केले. तसेच त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांना यश देखील मिळवून दिले आहे. मुख्याध्यापिका रेणुका देवी कोरनाथ, उपमुख्याध्यापिका स्मिता गिरी आणि शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.