Dehuroad : दगडाने मारहाण, कोयत्याचा धाक दाखवून घातला दरोडा; सात जणांवर गुन्हा

Stoned, robbed out of fear of being stabbed; Crime on seven people

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाणा-या दोघांना दगडाने बेदम मारहाण केली. कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबईल फोन आणि दुचाकी जबरदस्तीने काढून घेतली. हा प्रकार बुधवारी (दि. 10) रात्री साडेदहाच्या सुमारास मुकाई चौकाकडे जाणा-या रस्त्यावर रावेत येथील भोंडवे वस्ती येथे घडली.

याप्रकरणी शंकर दिलीप बिका (रा. किवळे गाव, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सात अनोळखी इसमांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या बहिणीने 25 हजार रुपये फिर्यादी यांच्या भावाच्या बँक खात्यावर पाठवले होते. ते पैसे फिर्यादी यांच्या मेहुण्याने एटीएममधून काढून घरी नेले होते.

मेहुण्याच्या घरून 24 हजार रुपये घेऊन फिर्यादी बुधवारी रात्री साडेदहा वाजता आपल्या घरी जात होते.

त्यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा भाऊ बिरगल जनाला होते. भोंडवे वस्ती येथे मुकाई चौकाकडे जाणा-या मार्गावरून ते बीआरटी रोडने जात होते.

त्यावेळी एक कार आणि दुचाकीवरून सातजण आले. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या भावाला अडवले आणि दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली.

कोयत्याच्या धाक दाखवून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून 24 हजार रुपये, मोबईल फोन जबरदस्तीने काढून घेतला. त्यावेळी फिर्यादी यांचा भाऊ तिथे पल्सर दुचाकी घेऊन आला.

आरोपींनी त्याच्याकडून पल्सर दुचाकी जबरदस्तीने घेतली आणि आरोपी निघून गेले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.