Dehuroad News : ऐतिहासिक बुद्धविहाराचा वर्धापन दिन 50 लोकांच्या उपस्थितीत होणार साजरा

एमपीसी न्यूज – देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा 66 वा वर्धापन दिन 25 डिसेंबर रोजी होणार आहे. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार असून कार्यक्रमासाठी केवळ 50 लोक उपस्थित राहणार आहेत.

दरवर्षी 25 डिसेंबर रोजी देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा  वर्धापन दिन साजरा केला जातो. या दिवशी राज्यभरातून तसेच अन्य राज्यातून देखील बौद्ध बांधव उपस्थित राहतात.

यावर्षी देखील 25 डिसेंबर रोजी वर्धापन दिनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, यासाठी जिहाधिकाऱ्यांनी काही सूचना दिल्या असून त्या सूचनांचे पालन केले जाणार आहे.

ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळला आहे. त्यामुळे परदेशातून येणारी विमानसेवा बंद करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील महापालिका क्षेत्रांमध्ये रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे

देहूरोड बुद्ध विहार   येथील पूजा, धार्मिक विधी, वंदन आदी कार्यक्रम 50 लोकांच्या उपस्थितीत होणार आहे. सर्वांना प्रशासनाकडून ओळखपत्र देण्यात येईल.

सुरक्षेचा उपाय म्हणून 25 डिसेंबर रोजी सेंट्रल चौक ते निगडी भक्ती शक्ती चौकदरम्यान वाहतूक बंद राहणार आहे. सेंट्रल चौकातून मुकाई चौक, रावेत मार्गे निगडी या मार्गावरील वाहतूक सुरु राहणार आहे.

बुद्ध विहार परिसरात साहित्य विक्री, पुस्तक स्टॉल, खेळणी, हातगाड्या, मंडप स्टेज, अन्नछत्र कुठल्याही प्रकारची दुकाने लावण्यास परवानगी नाही. देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाकडून वैद्यकीय सेवा, मोबाईल टॉयलेट, पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका आणि बॅरीगेटची व्यवस्था केली जाणार आहे.

बुद्ध विहार वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सोशल मीडियाद्वारे करण्यात येणार असून सर्व बौद्ध बांधवांनी घरात बसून दर्शन घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, 25 डिसेंबर रोजी देहूरोड परिसर, चिंचोली, किन्हई, मामुर्डी या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घरात बसून सोशल मीडियाद्वारे दर्शन घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.